- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रसारही आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. दररोजच्या बाधित रुग्णांची संख्या साडेतीनशेवर आली आहे. त्यामुळे मुंबईतील चाळी - झोपडपट्टी पाठोपाठ आता इमरतीही प्रतिबंधमुक्त झाल्या आहेत. सध्या मुंबईत केवळ एक इमारत प्रतिबंधित आहे.
मुंबईत २१ डिसेंबर २०२१ पासून तिसऱ्या लाटेचा प्रसार सुरु झाला. या काळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत एका दिवसात २० हजार बाधित रुग्ण आढळून येऊ लागले. यामुळे बाधित इमारतींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने पालिकेने नियमात सुधारणा केली. त्यानुसार २० टक्के घरांमध्ये किंवा किमान १० रुग्ण असल्यास इमारती सील करण्यास सुरुवात केली. परिणामी, सील इमारतींचा आकडा कमी होत गेला.
मुंबईत आता रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.०९ टक्के आहेत. तर एक हजार ४०७ रुग्णच रुग्णालयात उपचार घेत आहेत. होम क्वारंटाईन रुग्णांची संख्या ६० हजारच्या घरात आहे. त्यामुळे इमारत प्रतिबंधित होण्याचे प्रमाण कमी होत आता केवळ गोवंडी विभागात एक इमारत प्रतिबंधित आहे. तर आतापर्यंत दोन वर्षांच्या कालावधी तब्बल ६६ हजार ३३५ इमारती प्रतिबंधमुक्त झाल्या आहेत.