Join us  

आता विद्यार्थ्यांनाच करता येणार अभ्यासक्रमाची निवड; आयटीआय विद्यार्थ्यांसाठी नवीन उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 6:47 AM

आयटीआय विद्यार्थ्यांसाठी नवीन उपक्रम; रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाकडे वाटचाल

मुंबई : मागील काही वर्षांपासून आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असून अधिकाधिक विद्यार्थी कौशल्य आधारित प्रशिक्षण घेऊन व्यवसाय  किंवा स्वयंरोजगार करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर यापुढे आपल्याला कुठला अल्प मुदतीचा अभ्यासक्रम शिकायचा आहे? कुठले प्रशिक्षण आपल्याला उपयुक्त ठरणार आहे, याची निवड विद्यार्थ्यांनाच करता येणार आहे. 

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून १ ते १५ नोव्हेबर दरम्यान ‘सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ ही राज्यस्तरीय स्पर्धा जाहीर करण्यात आली असून ‘हटके’ संकल्पना सुचविणाऱ्या  विद्यार्थ्यांना बक्षीसही देण्यात येणार आहे. यामुळे आयटीआयमधील विविध व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणीनुसार अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अल्प मुदतीचे नवीन कौशल्य अभ्यासक्रम सुरू केल्यास संबंधित व्यवसायांमधील अत्याधुनिक व अद्ययावत कौशल्यांचे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींना प्राप्त होणार आहे. शासकीय व खासगी आयटीआयमध्ये सध्या विविध प्रकारचे ४० शिक्षणक्रम शिकविले जातात. त्यापैकी मोजके दहा-बारा ट्रेडच लोकप्रिय आहेत. तरीही यावर्षी सर्व शासकीय आयटीआयमधील सर्वच ट्रेडचे प्रवेश फुल्ल झाले आहेत. 

शॉर्ट टर्म सर्टिफिकेट कोर्स

औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात वेगाने बदल होत असल्याच्या काळात विद्यार्थ्यांना नवनवी कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे बनले आहे. हे लक्षात घेऊन आयटीआयमध्ये शॉर्ट टर्म सर्टिफिकेट कोर्सेस सुरू करण्याचा निर्णय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने घेतला असून, स्वत: अभ्यासक्रम निवडण्याची संधी  विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचे संचालक दिगंबर दळवी यांनी दिली आहे.

येत्या काळात आयटीआयचे स्वरूप अधिक रोजगाराभिमुख करायचा मानस आहे. त्यासाठीचा हा एक प्रयत्न असून प्रशिक्षणार्थ्यांना आवश्यक असलेल्या अल्प मुदतीच्या अत्याधुनिक व अद्ययावत कौशल्य अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण मूळ तालुक्यात अथवा जिल्ह्यात उपलब्ध होईल व प्रशिक्षणासाठी अन्य तालुका अथवा जिल्ह्यांमध्ये होणारे स्थलांतरही टाळता येईल.- मंगल प्रभात लोढा, कौशल्य विकास मंत्री

टॅग्स :विद्यार्थीमहाराष्ट्र सरकारशिक्षण