आता फक्त दोन लाख ४६ हजार दशलक्ष लीटर जलसाठा कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 02:05 AM2020-08-19T02:05:57+5:302020-08-19T02:06:02+5:30
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांमध्ये ५ ऑगस्ट रोजी अवघे ३७ टक्के जलसाठा होता.
मुंबई : ऑगस्ट महिन्यात मुसळधार बरसणाऱ्या पावसाने पाण्याचे टेन्शन मिटवले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांमध्ये ५ ऑगस्ट रोजी अवघे ३७ टक्के जलसाठा होता. त्यामुळे महापालिकेने २० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मात्र मुसळधार पावसाच्या हजेरीने आता सर्व तलावांमध्ये एकूण ८२.९५ टक्के जलसाठा जमा झाला आहे. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आता फक्त दोन लाख ४६ हजार ७२१ दशलक्ष लीटर जलसाठा कमी आहे.
सात तलावांमधून मुंबईला दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे तलाव क्षेत्रात मुबलक पाणीसाठा होता. त्यामुळे जुलै २०२०पर्यंत पाण्याचे टेन्शन जाणवले नाही. मात्र जुलैअखेरीस तलावात केवळ ३४ टक्के जलसाठा शिल्लक राहिला होता. तर पावसाने दडी मारल्यामुळे मुंबईत पाणी टेन्शन वाढले होते. परिणामी महापालिकेने वर्षभराच्या नियोजनासाठी पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला.
वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तलाव क्षेत्रात १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार ७२१ दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. ५ आॅगस्ट रोजी मुंबईसह तलाव क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसानंतर पाण्याची पातळी वाढण्यास सुरुवात झाली.
गेल्या १४ दिवसांमध्ये तब्बल ४६ टक्के जलसाठा वाढला आहे.
मंगळवारपर्यंत तलावांमध्ये एकूण १२ लाख ६४२ दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. त्यामुळे आता केवळ १७ टक्के जलसाठा कमी आहे.
आतापर्यंत तुळशी, विहार तलाव भरून वाहू लागले आहेत. तर मोडक सागर तलाव लवकरच भरून वाहू लागेल.
>जलसाठ्याची आकडेवारी(मीटर्समध्ये)
तलाव कमाल किमान उपयुक्त साठा (दशलक्ष) सध्या
मोडक सागर १६३.१५ १४३. २६ १२७४१० १६२.९०
तानसा १२८.६३ ११८.८७ १२९३९३ १२७.८०
विहार ८०.१२ ७३.९२ २७६९८ ८०.३५
तुळशी १३९.१७ १३१.०७ ८०४६ १३९.३०
अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९७.०२ ८०१२२ ६०१.२३
भातसा १४२.०७ १०४.९० ३९५३०० १३६.९१
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० १०८२५४ २८१.५७
>१८ आॅगस्ट रोजी तलावांमध्ये जलसाठा
वर्ष जलसाठा टक्के
२०२० १२००६४२ ८२.९५
२०१९ १३६३४०३ ९४.२०
२०१८ १३१८२२२ ९१.०८