आता रस्त्यावर पार्क करा चारचाकी वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:06 AM2021-02-18T04:06:12+5:302021-02-18T04:06:12+5:30
वाहतूक पाेलीस; काेंडी टाळण्यासाठी ‘स्ट्रीट पार्किंग’चा पर्याय लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत वाहने वाढत आहेत. त्या तुलनेत पार्किंग ...
वाहतूक पाेलीस; काेंडी टाळण्यासाठी ‘स्ट्रीट पार्किंग’चा पर्याय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत वाहने वाढत आहेत. त्या तुलनेत पार्किंग व्यवस्था नसल्याने अनेक वाहने नो पार्किंगमध्ये पार्क करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी हाेत आहे. यावर पर्याय म्हणून वाहतूक पोलिसांनी आता स्ट्रीट पार्किंगचा नवा उपक्रम हाती घेतला आहे.
मुंबईत सुमारे ३६ लाख वाहने आहेत. त्या तुलनेत वाहतूक व्यवस्था अपुरी पडत आहेत. मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे. नवीन इमारती, आस्थापनाच्या बांधकामादरम्यान वाहतूक व्यवस्था करणे बंधनकारक आहे; मात्र आजही बऱ्याच जुन्या इमारतींमध्ये वाहतूक व्यवस्था नसल्याने रस्त्यावरच वाहनांच्या रांगा लागत आहेत. गेल्या काही दिवसांत अवैध पार्किंगविरोधात वाहतूक पोलिसांनी कठोर पावले उचलत नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाईचा वेग वाढवला आहे. काही ठिकाणी पोलिसांना वादालाही तोंड द्यावे लागत आहे. जागा नसल्याने वाहने पार्क कुठे करायची? असा सवाल काही रहिवासी सोसायट्यांमधील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पर्यायी व्यवस्था देण्याची नागरिकांची मागणी आहे. त्यानुसार, नागरिकांसाठी पोलिसांकडून पर्यायी स्ट्रीट पार्किंगचा उपक्रम राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
* ...त्यानंतरच मिळणार परवानगी
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रस्ताव आल्यास संबंधित रस्त्यावरील वाहतूक कोंडी, नो पार्किंगमध्ये वाहने उभी केल्यास पादचाऱ्यांना होणारा त्रास, संबंधित इमारत, व्यावसायिक आस्थापनेव्यतिरिक्त अन्य वाहने तेथे उभी राहणार नाहीत, याचे नियोजन आणि अन्य निकष पडताळून त्यानंतरच वाहने पार्क करण्यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात येणार आहे.........
* कफपरेडमधून ३ प्रस्ताव
स्ट्रीट पार्किंगची परवानगी मागणारे तीन प्रस्ताव कफ परेड परिसरातून प्राप्त झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. याबाबत वाहतूक पोलीस अधिक माहिती घेत आहेत. प्रत्यक्ष पाहणी करून परवानगी मागणाऱ्यांकडे खरोखरच वाहनतळ नाही, याची खातरजमा केली जाईल. या ठिकाणाहून सार्वजनिक वाहन तळ लांब आहे का, किती वाहने संबंधित ठिकाणी उभी राहू शकतील, त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही ना, या बाबी प्रत्यक्ष पडताळून परवानगी दिली जाईल, असेही वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
* पालिकेला द्यावे लागेल शुल्क
हा उपक्रम मोफत नसून स्ट्रीट पार्किंगसाठी पालिकेला शुल्क द्यावे लागणार आहे. त्यात वाहनाच्या सुरक्षेबरोबर त्या ठिकाणी परवानगी नसलेली अन्य वाहने पार्क केली जाणार नाहीत, याची जबाबदारी संबंधित सोसायटीवर असेल. सध्या तात्पुरत्या स्वरूपात याची अंमलबजावणी करून पुढे संपूर्ण मुंबईत हा उपक्रम सुरू करण्याचा वाहतूक पोलिसांचा प्रयत्न आहे.
* मुंबईत अवघे ९२ वाहनतळ
मुंबईत एकूण ९२ वाहनतळ आहेत. वाहनांच्या तुलनेत याचे प्रमाण कमी आहे.
.........................
येथील कोंडी सुटेना
वाहने आणि पादचाऱ्यांनी फुलून जाणाऱ्या मुंबईतील गोखले रस्ता, महर्षी कर्वे रस्ता, एल.बी.एस मार्ग, न्यू लिंक रोड आणि एस. व्ही. रोड या रस्त्यांवर कोंडीची समस्या कायम आहे.