आता पार्किंगही भाडेतत्त्वावर; धोरण लवकर तयार करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 08:17 IST2025-03-03T08:16:01+5:302025-03-03T08:17:20+5:30

परिवहन भवनच्या भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.   

now parking is also on lease in mumbai thane and pune cm devendra fadnavis directs to prepare policy soon | आता पार्किंगही भाडेतत्त्वावर; धोरण लवकर तयार करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

आता पार्किंगही भाडेतत्त्वावर; धोरण लवकर तयार करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईसह राज्यातील सर्वच शहरांमध्ये पार्किंगची समस्या आहे. त्यामुळे भविष्यात जर गाडी खरेदी करायची असेल; पण स्वत:कडे पार्किंगची सोय नसेल तर राज्य सरकारकडून भाडेतत्त्वावर ॲप आधारित पार्किंगची सेवा देण्यात येणार आहे. त्यामुळे स्वत:कडे पार्किंगची व्यवस्था नसली तरी गाडी खरेदी करता येईल, असे धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी परिवहन विभागाला दिले. परिवहन भवनच्या भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.  
   
महापालिकेने तयार केलेल्या अनेक पार्किंगच्या जागा नागरिक वापरत नाहीत. यासाठी मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या सर्व महापालिकांच्या पार्किंग जागांचे मॅपिंग करून एका ॲपवर आणणे गरजेचे आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिक पार्किंगची जागा भाडेतत्त्वावर घेऊ शकतील. या धोरणात्मक निर्णयामुळे रस्त्यावरचे अनधिकृत पार्किंग, वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारे रस्ते अपघात टाळता येणे शक्य होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. 

शहरांमध्ये पार्किंगसाठी मोठी समस्या निर्माण होणार असल्याने येत्या वर्षभरात पार्किंग धोरण आणणे आवश्यक असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. लोक घर विकत घेतात परंतु पार्किंग मात्र घेत नाहीत, तर रस्त्यांवर बेशिस्तपणे गाड्या उभ्या करतात. याला आळा घालून त्यासाठी धोरणात्मक तरतुदी करण्याची गरज आहे. त्यासाठी अधिवेशनामध्ये या विषयावर चर्चा करण्याची विनंती सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना केली. 

...तर सार्वजनिक पार्किंग व्यवस्थेची हमी

मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या वाहतूक कोंडीच्या शहरांमध्ये ज्याच्याकडे पार्किंगची जागा आहे, त्यालाच वाहन खरेदीची मुभा देणाऱ्या पार्किंग धोरणास शासनाने मंजुरी द्यावी, या सरनाईक यांच्या मागणीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुजोरा दिला. भविष्यात नागरिकांनी वाहन खरेदी करताना पार्किंग व्यवस्था आहे की नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे.  जर स्वतःची पार्किंग व्यवस्था नसेल तर महापालिकेच्या  मदतीने सार्वजनिक पार्किंग व्यवस्थेचा वापर करण्याची हमी मिळेल, अशा पद्धतीचे पार्किंग धोरण परिवहन विभागाने तयार करावे. त्याला शासनाचा पूर्ण पाठिंबा असेल, असे  मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Web Title: now parking is also on lease in mumbai thane and pune cm devendra fadnavis directs to prepare policy soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.