आता पियाली भीक मागणार नाही, शाळेत जाणार..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 06:48 AM2018-07-23T06:48:51+5:302018-07-23T06:49:16+5:30
मामा-मावशीने प्रवृत्त केले होते भीक मागण्यास
-सीमा महांगडे
मुंबई : घरी मामा आणि मावशी यांचा जाच... त्यांना घाबरून दिवसभर अंधेरी स्टेशनवर भीक मागणे, त्यानंतरही पोटभर दोन घास खायला मिळतील की नाही, याचीही पियालीला शाश्वती नसायची. अशात अचानक मुंबईतल्या बालरक्षकांनी तिचा शोध घेतला आणि तिचे आयुष्यच बदलले. आता पियाली ‘स्नेहसदन’मध्ये असून, पुढच्या महिन्यापासून शैक्षणिक प्रवाहात सामील होऊन ती शाळेत जाणार आहे. आता स्टेशनवर भीक मागण्याऐवजी तिच्या हातात पुस्तक येणार आहे. मुंबईतील शिक्षण विभागाच्या अखत्यारीत कार्यरत बालरक्षकांमुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे या बालरक्षकांचे कौतुक शिक्षण विभागाकडून होत आहे.
मूळची बंगाल येथे राहणाऱ्या पियालीला मामाने मुंबईत आणले. तिच्या मामा व मावशीला नशेचे व्यसन होते. मामा-मावशीच्या राक्षसी वृत्तीने स्वत:च्या नशेसाठी पियालीचा वापर करून घेण्याचे ठरविले. त्यांनी थोड्या दिवसांतच १० वर्षांच्या निरागस मुलीला अंध बनण्याचे नाटक करायला लावून भीक मागण्यास प्रवृत्त केले.
छोटी पियाली हातात काठी घेऊन भीक मागून पैसे मामा-मावशीकडे देत असे आणि ते त्या पैशातून मजा मारत असत. अंधेरी स्टेशनवर दहा वर्षांच्या अंध पियालीला भीक मागताना त्या विभागातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पांड्ये यांनी पहिले. त्यांनी त्वरित तिचा फोटो काढत तिची माहिती फेसबुकवर टाकली आणि मानव संसाधन विकास, दिल्ली यांना त्यात टॅग केले. त्यांनी संबंधित पोस्टची दखल घेत पुण्यातील समता विभाग, विद्या प्राधिकरण यांना माहिती दिली. हे प्रकरण मुंबईतील बालरक्षकांच्या टीमकडे सोपविण्यात आले.
बालरक्षक समन्वयक वैशाली शिंदे आणि त्यांच्या टीमने ही जबाबदारी स्वीकारून पियालीचा शोध सुरू केला. सलग ४ ते ५ दिवस प्रशांत पांड्ये आणि २-३ बालरक्षकांसह तिचा शोध सुरू होता. अखेर ती सापडली. ती अंध नाही हे तत्काळ सिद्ध झाले. तिच्याकडून संपूर्ण कहाणी ऐकल्यानंतर समन्वयक तिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी घेऊन गेले.
मात्र, पोलिसांनी हवे तसे सहकार्य न केल्याने त्यांना शिक्षण विभागातील वरिष्ठांची मदत घ्यावी लागली. अखेर बालरक्षकांच्या अथक परिश्रमाने पियालीची तिच्या मामा-मावशीकडून सुटका करण्यात आली.