मुंबई : पाणी व वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही धोकादायक इमारत रिकामी करण्यास तयार नसलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी अखेर पोलीस बळाचा वापर करण्यात येणार आहे. ही इमारत म्हाडाच्या अखत्यारीत असल्याने याबाबत म्हाडा आणि पोलीस दलाकडे पुढील कारवाई सोपविण्यात येणार आहे.लालबागचा राजा गणेशोत्सवाच्या स्थळापासून ५० मीटरवर असलेल्या सहजीवन सोसायटीला महापालिकेने धोकादायक जाहीर केले आहे. चार मजल्यांच्या या दोन इमारती ४५ वर्षे जुन्या असून यात शंभर कुटुंबे राहतात. स्ट्रक्चरल आॅडिट करण्याच्या नोटिसीला या सोसायटीने दाद न दिल्यामुळे पालिकेने खासगी आॅडिटरमार्फत तपासणी केली. त्यानुसार ही इमारत सी १ म्हणजे ‘अतिधोकादायक’ असून तत्काळ रिकामी करावी, अशी शिफारस या आॅडिटरने केली होती.त्यानुसार पालिकेने इमारत खाली करण्याची नोटीस पाठविली. मात्र या इमारतीची पुनर्बांधणी होणार असल्याने विकासकाकडून पर्यायी जागा मिळण्याच्या प्रतीक्षेत येथील रहिवासी आहेत. विकासकांनी सध्या या इमारतीला टेकू लावले आहेत. कलम ३५४ अंतर्गत इमारत रिकामी करण्याची नोटीस देत पालिकेने या वीज व पाणी मंगळवारपासून तोडले आहे. तरीही रहिवासी मेणबत्तीच्या प्रकाशात रात्र काढत आहेत.पालिकेने नोटीस बजावूनही घर खाली करण्यास नकारधोकादायक इमारतींमधील रहिवासी पालिकेच्या नोटिसीला न जुमानता जीव मुठीत घेऊन जगत असतात. अशा अनेक धोकादायक इमारती दक्षिण मुंबईत आहेत. वीज व पाणी तोडूनही रहिवासी पर्यायी व्यवस्था नसल्याने घर सोडण्यास तयार होत नाहीत.सहजीवन सोसायटीला पालिकेने तीनवेळा धोक्याचा इशारा दिला आहे. मात्र ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांची गैरसोय व हाल होतील, म्हणून रहिवासी दररोज देवाचे नाव घेत आलेला दिवस ढकलत आहेत.- वारंवार सतर्क करूनही रहिवासी इमारत खाली करीत नसल्याने वीज व पाणी तोडले. तरीही विकासकाकडून पर्यायी जागा मिळण्याच्या प्रतीक्षेत हे रहिवासी त्या धोकादायक इमारतीतच राहत आहेत. ही इमारत पालिकेची नाही. त्यामुळे म्हाडा आणि काळाचौकी पोलीस ठाण्याला उचित कारवाई करण्याची सूचना करण्यात येणार असल्याचे एफ दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त किशोर देसाई यांनी सांगितले.
कारवाईसाठी आता पोलिसांची साथ; पालिका सोपवणार म्हाडा आणि पोलीस दलाकडे सूत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 2:42 AM