पोलिसांसाठी आता ‘एमडीटी पॅटर्न’

By admin | Published: January 2, 2016 08:34 AM2016-01-02T08:34:48+5:302016-01-02T08:34:48+5:30

शहरात एखाद्या प्रकरणातून वाद चिघळण्याच्या अनेक घटना घडतात. त्या वेळी उद्भवलेल्या परिस्थितीत जमाव हिंस्र बनतो. अशावेळी त्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस कुमक लगेचच

Now for the police 'MDT Pattern' | पोलिसांसाठी आता ‘एमडीटी पॅटर्न’

पोलिसांसाठी आता ‘एमडीटी पॅटर्न’

Next

- जितेंद्र कालेकर,  ठाणे
शहरात एखाद्या प्रकरणातून वाद चिघळण्याच्या अनेक घटना घडतात. त्या वेळी उद्भवलेल्या परिस्थितीत जमाव हिंस्र बनतो. अशावेळी त्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस कुमक लगेचच धाडणे शक्य नसते. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. मात्र हे सर्व आता टाळता येणार आहे. यासाठी ‘मोबाइल डाटा ट्रान्समीटर’ अर्थात ‘एमडीटी’ हा लखनौ पॅटर्न अवलंबवला जाणार आहे. यामुळे अशा कुठल्याही घटनेचे चित्रण पोलिसांना पोलीस नियंत्रण कक्षात दिसणार आहे. लखनौ शहरातील पोलीस नियंत्रण कक्षात बसवलेली ही यंत्रणा महाराष्ट्रातील केवळ ठाणे शहरात सर्वप्रथम बसवण्यात येत आहे. त्यामुळे आता पोलिसांची कुमक धाडण्यास विलंब झाल्याचा ठपका पोलिसांवर येणार नाही.
खून, दरोडा, लूटमार, छेडछाड अथवा दंगलीचा प्रकार नियंत्रण कक्षात दिसण्याची ही यंत्रणा १ कोटी ३० लाख रुपये खर्च करून बसवण्यात येणार आहे. ठाण्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या वाहनांमध्ये ‘एमडीटी’चा संच बसविण्यात येणार आहे. बीट मार्शलकडे देण्यात येणाऱ्या स्मार्टफोनद्वारे घटनास्थळाचे थेट चित्रण मुख्य नियंत्रण कक्षात दिसेल. त्यामुळे लागलीच परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता पावले उचलणे सोपे होईल. पोलिसांच्या वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणाही बसविली जाणार आहे. त्याद्वारे वाहनाचे लोकेशन तत्काळ नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांना कळेल. लखनौ पोलिसांकरिता ज्या कंपनीने एमडीटी आणि जीपीएसची यंत्रणा बसवली त्याच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि सह पोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना या सॉफ्टवेअरचे प्रेझेंटेशन दाखविले.
ठाणे आयुक्तालय भौगोलिकदृष्ट्या मोठे आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, वागळे इस्टेट या पाच परिमंडळाच्या ३४ पोलीस ठाण्यांच्या परिसराचे क्षेत्र व्यापक आहे. तब्बल ५५ लाखांची लोकसंख्या या आयुक्तालयाच्या कार्यकक्षेत येते. कोणतीही घटना घडल्यानंतर तातडीने पोलीस पोहोचण्यासाठी या यंत्रणेचा ठाणे पोलिसांना चांगला उपयोग होणार असल्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी ‘लोकमत’ला सांगितले. गतिमान आणि लोकाभिमुख पोलिसिंगसाठी ही यंत्रणा निश्चितच राज्यातील पोलिसांसाठी पथदर्शी ठरणार असल्याचेही ते म्हणाले. २ ते ७ जानेवारीदरम्यान ठाण्यात राबविण्यात येणाऱ्या पोलिसांच्या रायझिंग डेपासून यंत्रणेचे काम युद्धपातळीवर करण्यात येणार आहे.

भिवंडीत ही यंत्रणा हवी होती
भिवंडीत पोलीस ठाणे बांधण्यावरून झालेल्या वादातून दंगल उसळल्यानंतर दोन पोलिसांना जिवंत जाळण्यात आले होते. भिवंडी पुलाकडे जाणारे रस्ते अडवून त्यांना जाळण्यात आले. त्या वेळी ही यंत्रणा असती तर चारही बाजूंनी पोलीस फोर्स तत्काळ आणता आला असता आणि ही घटना टाळता आली असती, असेही एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

काय होणार उपयोग : एखादी घटना समजल्यानंतर पोलिसांचे वाहन घटनास्थळी किती वेळात, कोणत्या मार्गांवरून गेले हे यामुळे समजणार आहे. पोलिसांकडून काय कारवाई झाली? किंवा तक्रारदाराने कोणाविरुद्ध काय तक्रार केली? याचे संपूर्ण चित्रणच केले जाणार आहे. त्यामुळे पोलिसांवर होणारे आरोप किंवा पोलिसांनी केलेले आरोप यातील सत्यासत्यता पडताळण्यासाठी एमडीटीचा विशेष उपयोग होणार आहे.

Web Title: Now for the police 'MDT Pattern'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.