Join us

आता पोलिसांची सायकलवरून गस्त

By admin | Published: June 11, 2015 5:55 AM

मुंबई पोलीस आता सायकलींवरून शहरातल्या गल्लीबोळात गस्त घालणार आहेत. अरूंद, अत्यंत वर्दळीचे रस्ते आणि समुद्र किनाऱ्यांवर गस्त घालता यावी

मुंबई : मुंबई पोलीस आता सायकलींवरून शहरातल्या गल्लीबोळात गस्त घालणार आहेत. अरूंद, अत्यंत वर्दळीचे रस्ते आणि समुद्र किनाऱ्यांवर गस्त घालता यावी यासाठी मुंबई पोलिसांनी एकूण २४ अद्ययावत सायकली विकत घेतल्या आहेत. प्रायोगिक तत्वावर महत्वाचे किनारे आणि शिवाजी पार्कसारख्या परिसरात पोलिसांची सायकल गस्त सुरू करण्यात आली आहे. अभिप्राय पाहून संपूर्ण शहरात हा प्रयोग राबवण्याबाबत निर्णय होणार आहे.मुंबई पोलिसांनी ८ बीच सायकल आणि १६ स्ट्रीट सायकल घेतल्या आहेत. दोन सायकल एकावेळी गस्त घालतील. पोलीस शिपाई या सायकल चालवतील. त्यापैकी एकाकडे वॉकीटॉकी तर दुसऱ्याकडे अद्ययावत दांडुका असेल. या सायकल अद्ययावत असून त्यांना ७ गिअर आहेत. सर्वसाधारण सायकल आणि यात बराच फरक असल्याने त्या चालविण्यासाठी पोलीस शिपायांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलीस शिपायांनी या सायकलवरून बुधवारी गस्तीस सुरूवात केली आहे.जिथे पोलिसांच्या मोटारसायकल किंवा जीप पोहोचू शकत नाहीत अशा किनाऱ्यांवर, गल्लीबोळांमध्ये पोहोचता यावे, पर्यावरणाचा समतोलही राखला जावा, या विचाराने सायकलचा पर्याय समोर आला, अशी माहिती सहपोलीस आयुक्त( कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांनी दिली. मरिन ड्राईव्ह, गेट वे आॅफ इंडिया, गिरगाव, जुहू, वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड, वरळी, शिवाजीपार्क आणि ओशिवरा गार्डन या ठिकाणी हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. या सायकली किती फायदेशीर ठरतात हे पाहून हा प्रयोग शहरात राबविण्याचा निर्णय घेतला जाईल. (प्रतिनिधी)