मुंबई : मुंबई महानगरपालिकेने जैविक कचऱ्याच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी अनोखी उपाययोजना हाती घेतली आहे. त्यामुळे लवकरच मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांसह प्रसूतीगृह आणि दवाखान्यांमध्ये निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्याचे निर्जंतुकीकरण त्याच ठिकाणी केले जाईल. त्यामुळे प्रदूषणाला आळा बसणार आहे. यासाठी ४१ ठिकाणी बायोमेडिकल कचरा निर्जंतुकीकरण मायक्रोवेव्ह आधारित प्रणालीचा वापर केला जाईल. यामुळे जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावताना संसर्ग रोखण्यास मदत होईल.रुग्णालयात रुग्णांच्या सेवेकरिता प्रयोगशाळा, विविध रुग्ण कक्ष, ऑपरेशन थिएटर, शवविच्छेदन गृह इत्यादी विभागांमध्ये दैनंदिन जैविक कचरा(बायोमेडिकल वेस्ट) तयार होतो. प्रयोगशाळेमध्ये वापरण्यात येणाऱ्या रक्ताच्या नमुन्यांच्या बाटल्या, ऑपरेशन थिएटरमध्ये कापलेले मानवी शरीराचे भाग हे जैविक कचऱ्यात मोडतात. याबाबत भारत सरकारच्या बायोमेडिकल वेस्ट(व्यवस्थापन व हाताळणी) नियम १९९८ संदर्भात २८ एप्रिल २०१६ च्या अधिसूचनेनुसार, बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाट लावण्यापूर्वी हा कचरा जेथे निर्माण होतो तेथेच निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक आहे, असे नमूद आहे. त्यानुसार, मुंबई महापालिकेने प्रमुख रुग्णालय, उपनगरीय रुग्णालये आणि दवाखाने आदींकरता ४१ बायोमेडिकल कचरा निर्जंतुकीकरण मायक्रोवेव्ह आधारित प्रणालीचा पुरवठा, उभारणी, चाचणी कार्यन्वित करणे आणि एक वर्षाच्या कालावधीसाठी वार्षिक देखभाल याकरिता कंपनीची निवड केली आहे. प्रणालीच्या उभारणीसाठी कंपनीची नियुक्तीमहापालिकेने मागवलेल्या निविदेत सन्मित्र इन्फ्रा लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली. कंपनीला या प्रणालीच्या उभारणीसाठी १० कोटी ८१ लाख रुपये आणि पाच वर्षांच्या देखभालीसाठी सव्वादोन कोटी व इतर कर आदींकरता १४ कोटी १६ लाख रुपयांचे कंत्राट दिले जाणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
आता जैविक कचऱ्याचे रुग्णालयातच निर्जंतुकीकरण करून प्रदूषण रोखणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 1:47 AM