Join us

आता लहान मुलांमध्येही पोस्ट कोविड गुंतागुंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:06 AM

वेळीच खबरदारी घ्या; वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लहान मुलांमधील वाढता कोरोना संसर्ग ...

वेळीच खबरदारी घ्या; वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लहान मुलांमधील वाढता कोरोना संसर्ग एप्रिल महिन्याच्या तुलनेत कमी झाला आहे. मात्र, आता शहर, उपनगरातील रुग्णालयांत लहानग्या रुग्णांमध्ये पोस्ट कोरोना गुंतागुंत वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नाेंदवले आहे. या पार्श्वभूमीवर अशा लहान मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

लहानग्या रुग्णांच्या पोस्ट कोविड गुंतागुंतीत मल्टीसिस्टीम इन्फेमेंट्री सिंड्रोम, पक्षाघात, श्वसनाला त्रास आणि सातत्याने ताप येण्याच्या तक्रारी समोर येत आहेत. बालरोगतज्ज्ञ डॉ. संजीव अहुजा यांनी सांगितले की, कोरोनामुक्तीच्या ४-६ आठवड्यानंतर लहानग्यांना एमआयएस आणि कावासकीसारख्या समस्या दिसून येत आहेत. कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर प्रतिपिंड निर्माण होण्याच्या काळात पोस्ट कोविड गुंतागुंत अधिक दिसून येते. लक्षणविरहीत आणि सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांमध्ये पोस्ट कोविड गुंतागुंत अधिक दिसून आली आहे, तर ५ ते १४ वयोगटांतील काही रुग्णांमध्ये हृदयविकाराच्या समस्याही दिसून आल्या आहेत.

जे. जे. रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. बेला वर्मा यांनी सांगितले, एप्रिल महिन्यात अशा ३३ रुग्णांवर उपचार केले, तर मार्चमध्ये ८ रुग्णांची नोंद होती. लाॅकडाऊनमुळे लहानग्यांना होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून लहानग्यांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले पाहिजे. परळ येथील केईएम रुग्णालयात सध्या केवळ सात लहान रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नवजात बालक ते ९ वर्षांदरम्यानच्या ४ हजार ३५१ रुग्णांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली, ही संख्या मे महिन्यात ३ हजार १३९वर आली. त्याचप्रमाणे १० ते १९ वयोगटातील १२ हजार २७७ मुला-मुलींना कोरोना झाला, हे प्रमाण कमी होऊन मे महिन्यात ३ हजार १३९ झाले. गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून नवजात बालक ते १९ वयोगटातील ३१ लाख ४३ हजार ५६१ लहानग्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

* धोका नाही, पण वेळीच सल्ला घ्या

बालरोगतज्ज्ञांच्या टास्क फोर्सचे लहानग्यांमधील पोस्ट कोरोना गुंतागुंतीकडे लक्ष आहे. आठवड्यातून दोनदा सर्व बालरोगतज्ज्ञ याविषयीच्या सर्व समस्यांचा आढावा घेत असतात. संसर्गाचे प्रमाण, प्रतिबंधक उपाययोजना, पोस्ट कोविड स्थिती अशा सर्व मुद्द्यांचे माॅड्युलही राज्य शासनाला सादर करण्यात आले आहे. धाेका नाही, पण पोस्ट कोविड स्थितीत आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास घरगुती उपाय न करता, वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.

- डॉ. बकुल पारेख,

माजी अध्यक्ष, इंडियन ॲकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स

........................................