Join us

आता मोबाइल नंबर आधारकार्डशी जोडण्यासाठी पोस्टमन करणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 1:35 PM

mobile number link to the Aadhaar card: मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडण्यासाठी लांबलचक रांगांमध्ये उभे राहून त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी सुखद बातमी आहे. आता या कामासाठी आधार केंद्रांमध्ये जाण्याची आवश्यकता नसून, घरबसल्या पोस्टमनच्या माध्यमातून ते करता येणार आहे.

मुंबई : मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडण्यासाठी लांबलचक रांगांमध्ये उभे राहून त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी सुखद बातमी आहे. आता या कामासाठी आधार केंद्रांमध्ये जाण्याची आवश्यकता नसून, घरबसल्या पोस्टमनच्या माध्यमातून ते करता येणार आहे.इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) यांनी त्यासाठी नुकताच करार केला आहे. त्यानुसार मोबाइल क्रमांक आधार कार्डला जोडण्याची प्रक्रिया पोस्टमन पूर्ण करणार आहेत. पोस्ट पेमेंट बँकेच्या देशातील ६५० हून अधिक शाखांमधील १ लाख ४६ हजार पोस्टमन आणि ग्रामीण टपाल सेवक ही सुविधा घरी उपलब्ध करून देतील. त्यासाठी पोस्टमनना स्मार्टफोन देण्यात येणार आहेत. या स्मार्टफोनमध्ये विशेष सॉफ्टवेअर असून, त्याच्या आधारे आधार कार्डशी मोबाईल क्रमांक जोडण्यात येणार आहे. त्यासाठी पोस्टमनना प्रशिक्षण दिले जाणार आहे.‘इंडिया पोस्ट पेमेंट बँके’चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ जे. व्यंकटराजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, टपाल खात्याचे देशव्यापी जाळे, पोस्टमन आणि ग्रामीण टपालसेवक यांच्या मदतीने ज्या भागांमध्ये अद्याप बँका पोहोचललेल्या नाहीत, तेथेही मोबाइल क्रमांक आधार कार्डाला जोडण्याची सेवा देणे शक्य होणार आहे. सध्या केवळ मोबाइल नंबर अपडेट करण्यापुरती ही सेवा आहे. लवकरच लहान मुलांचेही आधार कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

टॅग्स :मुंबई