Join us

आता मान्सूनपूर्व पाऊसही जोर पकडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 4:06 AM

मुंबई : अंदमानातून सुरू झालेली मान्सूनची घौडदौड वेग पकडत असून, १ जूनच्या आसपास मान्सून केरळात दाखल होईल, असा अंदाज ...

मुंबई : अंदमानातून सुरू झालेली मान्सूनची घौडदौड वेग पकडत असून, १ जूनच्या आसपास मान्सून केरळात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तर दुसरीकडे २८ मेपासून राज्यात बहुतांश ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची सरी कोसळण्यास सुरुवात होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. शिवाय २४ मे रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होईल, असाही अंदाज आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठळक घडामोडी अंतर्गत मराठवाडा आणि लगतच्या भागात असलेला चक्रवात आता विरून गेला आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. तर मराठवाड्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.