मुंबई - उच्च शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अनेक भावनिक, व्यावहारिक समस्या आणि आव्हानांना तोंड द्यावे लागते. यात कमी पडणारे विद्यार्थी नैराश्येच्या गर्तेतही जातात. या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्याला योग्य साहाय्य मिळावे यासाठी या समस्यांवर तोडगा काढण्याची जबाबदारी आता प्राध्यापकांवरच सोपविण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ‘विद्यार्थी समुपदेशन यंत्रणा’ सक्तीने राबविण्याचे आदेश सर्व विद्यापीठांना दिले आहेत.बदलांची भीती, तणाव, अस्वस्थता, होमसिकनेस, शैक्षणिक चिंता आदी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापकांनी संयुक्तपणे काम करावे, अशी समुपदेशन यंत्रणेची कल्पना आहे. त्यासाठी प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात यावे आणि २५ विद्यार्थ्यांचा गट अशा प्रशिक्षित प्राध्यापकाकडे सोपविण्यात यावा. या गटातील प्रत्येक विद्यार्थ्याचे पालकत्व संबंधित प्राध्यापकाने घ्यावे आणि वर्षभरात नियमित संपर्कात राहून त्यांच्या समस्या सोडविण्यास साहाय्य करावे. तसेच वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहप्रमुखाशीही या प्राध्यापकाने संपर्क ठेवून, विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीवर लक्ष ठेवावे, असे यूजीसीने २७ जानेवारी रोजी विद्यापीठांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात यूजीसीने १६ एप्रिल २०१५ रोजी काही मार्गदर्शन तत्त्वे निश्चित केली आहेत. या मार्गदर्शन तत्त्वातील ‘विद्यार्थी समुपदेशन यंत्रणे’चा भाग सर्व विद्यापीठ-महाविद्यालयांसाठी सक्तीचा करण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती विद्यापीठांना लवकरात लवकर यूजीसीला कळवायची आहे.
आता प्राध्यापक सोडविणार विद्यार्थ्यांच्या समस्या
By admin | Published: February 02, 2016 2:18 AM