आता मेरीटद्वारे होणार प्राध्यापकांची नियुक्ती; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 08:15 IST2025-01-08T08:14:24+5:302025-01-08T08:15:06+5:30

विद्यापीठाला वर्षभरात ७ पेटंट

Now professors will be appointed through merit; Information from Governor C. P. Radhakrishnan | आता मेरीटद्वारे होणार प्राध्यापकांची नियुक्ती; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची माहिती

आता मेरीटद्वारे होणार प्राध्यापकांची नियुक्ती; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : प्राध्यापकाची निवड गुणवत्ता आणि कार्यक्षमतेच्या आधारे झाली पाहिजे. यासाठी सर्वांना समान संधी मिळण्यासाठी प्रवेश परीक्षा घेण्याचा विचार आहे. त्यानंतर मुलाखतीद्वारे प्राध्यापकांची नियुक्ती केली जाईल. यातून मेरीटद्वारे निवडलेले गुणवत्ताधारक प्राध्यापक पुढील ३० वर्षांसाठी शिक्षण व्यवस्थेची काळजी घेतील, असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. 

मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षान्त समारोह राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी विद्यापीठाच्या फोर्ट परिसरातील सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृहात पार पडला. यावेळी राज्यपाल राधाकृष्णन बोलत होते. सध्या अनेक विद्यापीठांकडे आवश्यक तेवढे प्राध्यापक नाहीत. मात्र, महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये गुणवत्तेच्या आधारे शिक्षकांची निवड करण्यासाठी पारदर्शक प्रणाली निर्माण करण्याबाबत आग्रही आहोत. एमपीएससीद्वारे प्राध्यापकांची परीक्षा घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, त्यात काही अडचणी आहेत. त्यावर काम सुरू आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही राज्यपाल राधाकृष्णन यांनी सांगितले.

सर्व विद्यापीठांनी वर्षाच्या सुरुवातीलाच वर्षभराचे शैक्षणिक वेळापत्रक तयार करावे. ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे. तसेच, त्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. जून महिन्यापर्यंत निकाल जाहीर करून एक महिन्यात दीक्षान्त समारोह आयोजित करावा, असे निर्देश राज्यपाल यांनी दिले.

दीक्षान्त समारंभाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय कंरदीकर, अमेरिकेच्या सेंट लुईस विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. फ्रेड पेस्टेलो, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे आदी उपस्थित होते.

विद्यापीठाला वर्षभरात ७ पेटंट

  • मुंबई विद्यापीठाकडून संशोधनावर भर दिला जात आहे. त्यातून वर्षभरात विद्यापीठाला सात पेटंट मिळाली असून, त्यातील ४ पेटंट प्रसिद्ध झाली आहे.
  • ही पेटंट एंन्व्हारमेंट मॉनिटीरिंग सिस्टम, स्मार्ट सेन्सर ईक्विप्ड लॅम्प, अँटी स्नेक व्हेनम आदी विविध प्रकारात ही पेटंट मिळाली आहेत, अशी माहिती कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी दिली.


‘संशोधना’साठी निधी

विद्यापीठाला ३२ फंडींग संस्थांकडून विविध संशोधन प्रकल्पांसाठी ६४ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. एकूण ६६ प्रकल्पांसाठी हा निधी मिळाला आहे. पीएम उषा अंतर्गत २० कोटी, अल्पसंख्याक मंत्रालयांतर्गत १२ कोटी, व्हीआयडीसीकडून ६ कोटी ६६ लाख, जीएमआयडीसी ३ कोटी ७५ लाख रु. आणि सीएसआरच्या माध्यमातून ८५ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे, असेही कुलगुरू कुलकर्णी यांनी सांगितले.

Web Title: Now professors will be appointed through merit; Information from Governor C. P. Radhakrishnan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.