आता फ्लॅटधारकांच्या नावे मालमत्ता कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 05:43 AM2018-04-13T05:43:41+5:302018-04-13T05:43:41+5:30

नव्या इमारतींमधील फ्लॅटधारकांना यापुढे त्यांच्या मालमत्ता कराचे देयक त्यांच्या नावासह स्वतंत्र मिळेल. त्यामुळे सोसायटीने उशिरा कर भरल्यामुळे सहन कराव्या लागणाऱ्या दंडाची झळ या मालमत्ताधारकांना बसणार नाही़

Now property taxes in the names of the flat holders | आता फ्लॅटधारकांच्या नावे मालमत्ता कर

आता फ्लॅटधारकांच्या नावे मालमत्ता कर

googlenewsNext

मुंबई : नव्या इमारतींमधील फ्लॅटधारकांना यापुढे त्यांच्या मालमत्ता कराचे देयक त्यांच्या नावासह स्वतंत्र मिळेल. त्यामुळे सोसायटीने उशिरा कर भरल्यामुळे सहन कराव्या लागणाऱ्या दंडाची झळ या मालमत्ताधारकांना बसणार नाही़ मुंबई महापालिकेने याबाबत नुकतेच परिपत्रक काढून हा नियम १ एप्रिल २०१८ पासून भोगवटा प्रमाणपत्र मिळणाºया इमारतींना लागू केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ़ संजय मुखर्जी यांनी दिली़
नव्या नियमानुसार १ एप्रिल २०१८ पासून भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या इमारतींना आता स्वतंत्र देयके मिळतील. तर जुन्या इमारतींनी शंभर टक्के कर भरलेला असल्यास व त्या इमारतीच्या प्रत्येक सदनिकांची कागदपत्रे सोसायटीने उपलब्ध करून दिल्यास त्यांनाही सदनिकानिहाय मालमत्ता कर आकारला जाणार आहे़
पालिकेमार्फत वसूल करण्यात येणारा मालमत्ता कर हा त्या इमारती किंवा संबंधित सहकारी सोसायटीवर आकारण्याची पद्धत आहे. मात्र अनेकदा सोसायटीमधील अंतर्गत बाबींमुळे मालमत्ता कर पालिकेकडे जमा करण्यास विलंब किंवा थकबाकी वाढल्यास सोसायटीकडे वेळेत मालमत्ता कर जमा करणाºयांनाही त्याचा भुर्दंड सहन करावा लागतो़ त्याचबरोबर इमारतीतील एखाद्या फ्लॅटवर मालमत्ता कराची थकबाकी असल्यास त्याचा त्रास सोसायटीतील इतर सदस्यांना होऊ शकतो.
यामुळे मालमत्ता कराचे देयक स्वतंत्रपणे फ्लॅटधारकाच्या नावावर काढण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती़ अखेर ही मागणी मान्य करीत महापालिकेने सर्वच नवीन इमारतींमधील सदनिका व गाळेधारकांना त्यांच्या नावासह स्वतंत्र मालमत्ताकर देयक देण्याचा निर्णय घेतला आहे.
>मालमत्ता कराचा वाद मिटणार
अनेक वेळा नवीन सोसायटी व विकासकामध्ये मालमत्ता कर कोणी भरायचा, यावर वाद होतो़़ मात्र नव्या इमारतींमधील सदनिकांना यापुढे स्वतंत्र देयक मिळणार असल्याने विक्री न झालेल्या सदनिका व गाळ्यांचा मालमत्ता कर भरण्याची जबाबदारी संबंधित विकासकाची असणार आहे. तर विक्रीनंतर मालमत्ताकर भरण्याची जबाबदारी संबंधित सदनिका, गाळेधारकाची असणार आहे.
सामायिक उपयोगाच्या भागांबाबतचे मालमत्ता कर देयक सोसायटी झाल्यास सोसायटीच्या नावे देण्यात येतील.
येथे भरा मालमत्ता कर
महापालिकेची विभाग कार्यालये/सीएफसी येथे मालमत्ता कर भरता येतो. तसेच महापालिकेच्या www.mcgm.gov.in(portal.mcgm.gov.in)  या संकेतस्थळावर आॅनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरता येऊ शकतो. मालमत्ता कराच्या रकमेची व थकबाकीची माहितीही या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.सध्या मुंबईत सुमारे दोन लाख ७५ हजार करपात्र इमारती आहेत. या इमारतींमध्ये सुमारे २८ लाख सदनिका, गाळे आहेत.
या २८ लाख सदनिका, गाळ्यांपैकी साधारण एक लाख ४२ हजार सदनिकाधारकांनी, गाळेधारकांनी मालमत्ता कराची स्वतंत्र देयके पालिकेकडे अर्ज व सोसायटीचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेऊन करून घेतली आहेत.
जुन्या इमारतीतील फ्लॅटधारकांना पालिकेने स्वतंत्र देयक थेटे मिळण्याची सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून दिली आहे. मात्र यासाठी सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असते.

Web Title: Now property taxes in the names of the flat holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.