Join us

हार्बर मार्गावरील ब्लॉकवर आता प्रश्नचिन्ह

By admin | Published: October 30, 2015 12:37 AM

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेताना एकही मार्ग उपलब्ध होत नसल्याने मेगाब्लॉक नियमबाह्य ठरत असल्याची चर्चा होत आहे

मुंबई : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेताना एकही मार्ग उपलब्ध होत नसल्याने मेगाब्लॉक नियमबाह्य ठरत असल्याची चर्चा होत आहे. रेल्वेच्या नियमावलीत ब्लॉक घेताना एक मार्ग प्रवाशांना उपलब्ध होणे गरजेचे आहे आणि तसे होताना दिसत नाही. मागील आठवड्यात रविवारी हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आणि या ब्लॉकची वेळ वाढल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले होते. मागील रविवारी वडाळा येथे बारा डब्यांच्या आणि अन्य तांत्रिक कामांसाठी मस्जिद ते चुनाभट्टी आणि वडाळा रोड ते माहीम दरम्यान सहा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या ब्लॉकसाठी अप आणि डाऊन मार्ग बंद ठेवतानाच फक्त विशेष फेऱ्या चालवण्यात आल्या. सकाळी अकरा वाजता सुरू झालेला ब्लॉक संध्याकाळी पाच वाजेपर्यंत संपणे अपेक्षित होते. पण हा ब्लॉक संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहिला आणि त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गर्दीला सामोरे जावे लागले. एमआरव्हीसीने ठरवून दिलेल्या नियोजित वेळेत काम पूर्ण न केल्याने हार्बर वाहतुकीला फटका बसला. त्यामुळे एमआरव्हीसीला यापुढे दिवसा ब्लॉक न देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतल्याने सूत्रांकडून सांगण्यात आले. फक्त रात्रकालीन ब्लॉक घेऊन ही कामे पूर्ण करावीत, असे सुचविण्यात आल्याची माहिती देण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे यामुळे हार्बरवर घेण्यात येणाऱ्या ब्लॉकबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मध्य रेल्वेची मेन लाइन आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक घेताना अन्य मार्गावर लोकल सेवा वळवण्यात येतात. मात्र हार्बर मार्गावर ब्लॉक घेताना तसे होत नाही. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर डीसी ते एसी परावर्तन पूर्ण झाले आहे. (प्रतिनिधी)