Join us

Raj Thackeray भोंग्यांवरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले, बाळासाहेबांचा तो व्हिडीओ ट्विट करत शिवसेनेवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 9:26 AM

Raj Thackeray Loud speaker Row: मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे वारंवार शिवसेनेची कोंडी करत असून, आता Balasaheb Thackeray यांच्या भाषणातील काही भाग ट्विट करत त्यांनी शिवसेनेला डिवचले आहे.

मुंबई - मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि मनसे कमालीचे आक्रमक झालेले आहेत. महाराष्ट्र दिनी औरंगाबादच्या सभेतून दिलेल्या इशाऱ्यानुसार जिथे जिथे मोठ्या आवाजात अजान दिली गेली तिथे मनसेकडून हनुमान चालिसेचे पठण केले गेले. तर जिथे असे प्रकार घडले नाहीत तिथे हनुमान चालिसा पठण केली गेली नाही. दरम्यान, मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे वारंवार शिवसेनेची कोंडी करत असून, आता बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील काही भाग ट्विट करत त्यांनी शिवसेनेला डिवचले आहे.

राज ठाकरे Raj Thackeray यांनी ट्विट केलेल्या या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे सभेला संबोधित करताना दिसत आहेत. त्यात बाळासाहेब म्हणाले होते की, ज्या दिवशी माझं सरकार या महाराष्ट्रात येईल. त्यावेळी रस्त्यावर पढले जाणारे नमाज आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही. धर्म असा असावा लागतो तो राष्ट्रहिताच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा जर कुठे कुणाला उपद्रव होणार असेल. त्यांनी मला येऊन सांगावं, आम्ही त्याचा बंदोबस्त करण्यासाठी तयार आहोत. मशिदीवरचे लाऊडस्पीकर खाली येतील, असे बाळासाहेब ठाकरे स्पष्टपणे त्यात म्हणताना दिसत आहेत. तोच मुद्दा पकडून राज ठाकरे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना डिवचले आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील अनाधिकृत भोंगे उतरवण्याची मागणी केली होती. सरकारने मौलवींशी चर्चा करून भोंगे उतरवावेत अन्यथा मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू अशा इशारा दिला होता. राज ठाकरेंनी ४ मे पर्यंत सरकारला अल्टीमेटम दिला होता. राज ठाकरेंच्या अल्टीमेटमनंतर गृह खात्याने मनसे कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस पाठवली. काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र मनसे कार्यकर्ते अल्टीमेटमवर ठाम राहिले होते.

४ मे रोजी पहाटे काही ठिकाणी अजानवेळी मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावली. कांदिवलीच्या चारकोप भागात असणाऱ्या मशिदीवरील अजान सुरू होताच हनुमान चालीसा लावण्यात आली. वाशिममध्येही अजान सुरू असताना मनसे कार्यकर्त्यांनी भोंग्यावर हनुमान चालीसा लावली. नवी मुंबईत हनुमान चालीसा लावण्यात आली. तर ३ मे रात्री उशिरा मुंबापुरीत मनसे कार्यकर्त्यांनी दर्ग्यासमोर हनुमान चालीसा लावण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने लोकं रस्त्यावर उतरले होते.

टॅग्स :राज ठाकरेमनसेबाळासाहेब ठाकरेशिवसेना