Join us

मुंबईतील पुलांचे आता नियमित ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 4:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ब्रिटिशकालीन अनेक पूल सध्या धोकादायक स्थितीत आहेत. मुंबईतील ३४४ पुलांचे ऑडिट केल्यानंतर तब्बल २९ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ब्रिटिशकालीन अनेक पूल सध्या धोकादायक स्थितीत आहेत. मुंबईतील ३४४ पुलांचे ऑडिट केल्यानंतर तब्बल २९ असे पूल आढळून आले होते. त्यानुसार धोकादायक पुलांची पुनर्बांधणी, दुरुस्ती टप्प्याटप्प्याने सुरू आहे. मात्र, यापुढे प्रत्येक पुलाचे नियमित ऑडिट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी सर्व पुलांच्या तपासणीकरिता वास्तुविशारदाची नियुक्ती केली जाणार आहे.

शहर भागातील ब्रिटिशकालीन पुलांची वयाेमर्यादा संपली आहे. धाेकादायक बनलेल्या या पुलांची तातडीने दुरूस्ती करणे आवश्यक आहे. २०१४ मध्ये पुलांचे ऑडिट झाले. मात्र, जुलै २०१८ मध्ये अंधेरी येथील गाेखले पूल कोसळून दोन लोकांचा मृत्यू झाला. तर पालिकेच्या ऑडिटमध्ये फिट ठरलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘हिमालय’ पादचारी पूल मार्च २०१९ मध्ये काेसळून सात लाेकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने ऑडिट अहवालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर पुन्हा नव्याने उड्डाणपूल आणि पादचारी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले.

या ऑडिटमध्ये अतिधोकादायक ठरलेले पूल पाडून त्यांची पुनर्बांधणी केली जात आहे. तर मोठ्या दुरुस्ती व किरकोळ दुरुस्ती आवश्यक असलेल्या पुलांचे काम केले जाणार आहे. मात्र, धोकादायक यादीत नसलेल्या पुलांची तपासणी आवश्यक असल्याने पालिकेने वास्तुविशारद नेमून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

* मुंबईतील एकूण ३४४ पुलांची देखभाल पालिकेतर्फे केली जाते. यामध्ये उड्डाणपूल, पादचारी पूल, भुयारी मार्ग, स्काय वॉक यांचा समावेश आहे.

* पाच वर्षांचे हे कंत्राट असून प्रत्येक पुलाची वर्षातून एकदा तपासणी केली जाणार आहे. त्याचा अहवाल प्रशासनाला देणे बंधनकारक असेल.

* मुंबईतील धोकादायक पुलांची दुरुस्ती व पुनर्बांधणी तसेच नवे पूल बांधण्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात ९६१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अतिधोकादायक असल्याने पुनर्बांधणी - २९

मोठी दुरुस्ती - ४७

किरकोळ दुरुस्ती - १४४

असे काही पूल अपघात..

* मार्च २०१९- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पादचारी पूल कोसळून सात लोकांचा मृत्यू झाला होता.

* जून २०१८ - अंधेरी स्थानकाजवळील गोखले पुलाचा भाग कोसळून दोन मृत्यू, चार जखमी.

* ऑक्टोबर २०१७ - चर्नीरोड स्थानकाजवळील पादचारी पुलाचा जिना कोसळून एक जखमी.

* डिसेंबर २०१५ - मालाड ते मालवणीदरम्यानचा एव्हरशाइन नगर येथील पूल कोसळून नऊ जखमी.