Join us

आता मुस्लिमांचेही क्रांती मोर्चे

By admin | Published: September 29, 2016 3:52 AM

मुस्लिम समाजातील मोठ्या घटकाची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्या समाजाला आरक्षण देण्यास न्यायालयाने मान्यता दिली आहे, पण त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही.

ठाणे : मुस्लिम समाजातील मोठ्या घटकाची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्या समाजाला आरक्षण देण्यास न्यायालयाने मान्यता दिली आहे, पण त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही. केंद्र आणि राज्य सरकार धर्म पाहून काम करतात का, असा प्रश्न उपस्थित करून आरक्षणाच्या मागणीवर सरकारला जाग आणण्यासाठी ७ आॅक्टोबरपासून राज्यभर मुस्लिम क्रांती मोर्चे काढले जाणार असल्याची घोषणा बुधवारी ठाण्यात करण्यात आली. ज्या शिफारशींमुळे मुस्लिमांच्या विकासाची दारे खुली होतील, त्या सच्चर समितीच्या शिफारशींवर केंद्र आणि राज्य सरकार विचार करीत नाही. न्यायालयाने मुस्लिमांना दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळेच राज्यभर मोर्चे काढले जातील. हे मोर्चे मराठा मोर्चाच्या धर्तीवर असतील आणि त्याची सुरु वात मुंब्रा येथून होईल, असे या वेळी मौलवींनी जाहीर केले. मुस्लिम समाजाकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. त्यामुळे या देशात राहायचे की नाही, असा मुद्दा उपस्थित करत हे सरकार नेमके कोणाचे आहे, असासवालही त्यांनी पत्रकार परिषदेत केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा पाठिंबा आहे, पण ज्या समाजाला न्यायालयाने आरक्षण देण्यास नकार दिला आहे, त्या समाजाला हे सरकार आरक्षण देऊ पाहतेय. या देशातील मुस्लिमांची स्थिती खालावली आहे. त्या समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे. त्याकडे लक्ष देण्यास या सरकारांना वेळ नाही, अशी कडवट टीकाही त्यांनी केली. या पत्रकार परिषदेला मोहम्मद अन्सारी रझा, नासीर अली खान, मौलाना अझहर हुसेन सिद्दीकी, मौलाना नसीम अहमद फरिदी, मौलाना मुसिबूल रेहमान, कारी सरताज, अमान उल्लाह सरगुल, करी मोहम्मद मुकीं, मोहम्म्द शकील अर्जबेगी, राईस अहमद सिद्दीकी, डॉ. एम. शहा, शाहीन मोहमद अश्रफ, फातिफा जम्दडून शेख, शबाना इकबाल शेख, जुलेखा असलम शेख, रहीम मुस्ताक अली, मोमीन स्वालेहा इरफान या शिक्षिका, करी नासीरुद्दीन, मौलाना रियाझ अहमद सय्यद, हाफिज शाहनवाज, मौलाना अबीद हुसेन आणि सय्यद अली अश्रफ, शमीम खान आदी उपस्थित होते. राज्यभरात सध्या आरक्षणासह इतर प्रश्नांवर मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने क्र ांती मोर्चे निघत आहेत. आता याच धर्तीवर मुस्लिम समाजही रस्त्यावर उतरणार आहे. न्यायालयाने मंजूर केलेले आरक्षण लागू करा, अशी मागणी अशा क्र ांती मोर्चाच्या माध्यमातून मुस्लिम सरकारकडे करणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी या मौलवींनी पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याची मागणीही केली. (प्रतिनिधी) मुंब्य्रातील मोर्चा ७ आॅक्टोबरलामुस्लिम क्रांती मोर्चात न्यायालयाने मंजूर केलेले आरक्षण लागू करण्याची मागणी प्राधान्याने केली जाईल. मुंब्य्रातील दारु ल फलाह ते मुंब्रा रेल्वे स्टेशनजवळील जामा मशिदीपर्यंत शुक्रवार, ७ आॅक्टोबरला पहिला मोर्चा निघेल. त्यात लाखो मुस्लिम सहभागी होतील. त्यानंतर मुंबई, मालेगाव, नाशिक यासह राज्यभरात असे मोर्चे काढले जातील, असे मुस्लिम क्र ांती मोर्चासाठी एकत्र आलेल्या मौलवींनी जाहीर केले.आव्हाड अनुपस्थित : मुस्लिम समाजाच्या मागण्यांसंबंधीच्या पत्रकार परिषदेची निमंत्रणे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यालयाने धाडली व पत्रकार परिषदेला ते स्वत: उपस्थित राहतील, असे संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर धाडण्यात आले होते. प्रत्यक्षात पत्रकार परिषदेला ते हजर नव्हते.