आता ‘राइट टू सिटी’ चळवळ

By Admin | Published: February 7, 2017 04:36 AM2017-02-07T04:36:19+5:302017-02-07T04:36:19+5:30

पाच वर्षांपूर्वी मुंबईत उभी राहिलेली ‘राइट टू पी’ची (आरटीपी) चळवळ शहरासह राज्यात पसरली आहे. कोरो संस्थेतून सुरू झालेल्या आरटीपी चळवळीने आता फोटोग्राफी प्रमोशन

Now the 'Right to City' movement | आता ‘राइट टू सिटी’ चळवळ

आता ‘राइट टू सिटी’ चळवळ

googlenewsNext

मुुंबई : पाच वर्षांपूर्वी मुंबईत उभी राहिलेली ‘राइट टू पी’ची (आरटीपी) चळवळ शहरासह राज्यात पसरली आहे. कोरो संस्थेतून सुरू झालेल्या आरटीपी चळवळीने आता फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्टच्या सहकार्याने पुढचे पाऊल टाकले आहे. मुंबई शहरात आता ‘राइट टू सिटी’ ही एक नवीन चळवळ उभी राहात आहे.
महिलांना मोफत, स्वच्छ, सुरक्षित मुताऱ्या मिळाव्यात, या मागणीसाठी संस्थांनी एकत्र येऊन आरटीपी चळवळ सुरू केली होती, पण गेल्या पाच वर्षांमध्ये ही चळवळ लिंगभेद विसरून व्यापक झाली आहे. या चळवळीत पुरुषांसह तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी मागणी होताना दिसत आहे. या चळवळीबरोबरच आता दुसऱ्या चळवळीची सुरुवात करण्यात येत आहे.
मुंबई शहरात राहणाऱ्यांना अनेक गोष्टी अंगवळणी पडल्या आहेत. कचरा, उघड्यावर शौचास बसणारी माणसे, गर्दी, फुटलेल्या पाइपलाइन, उघडी गटारे, टँकरने होणारा पाणीपुरवठा, झोपडपट्टी, तिथे असणारी अस्वच्छता, माणसांना राहायला घरे नाहीत, म्हणून पदपथावर थाटलेले संसार, शौचालयांची दुरवस्था अशा अनेक गोष्टी मुंबईकरांच्या अंगवळणी पडल्या आहेत. या सर्व गोष्टी डोळ्यांत खुपत नाहीत. कारण हे असेच आहे, असेच राहणार, अशी कुठेतरी मानसिकता होताना दिसत आहे.
छायाचित्रकार मुंबईच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात. त्यांना दिसणारी ही मुंबई त्यांनी कॅमेऱ्यात टिपली आणि त्यातूनच ‘राइट टू सिटी’चा प्रवास सुरू झाला, असे कार्यकर्त्या सुप्रिया सोनार यांनी सांगितले. आता सर्व मिळून शहराच्या हक्कासाठी लढणार असून, सर्वांना समान हक्क मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचे सोनार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Now the 'Right to City' movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.