रस्त्यावरील प्रचाराचा धुरळा आता नेटवर
By admin | Published: October 5, 2014 10:54 PM2014-10-05T22:54:23+5:302014-10-05T22:54:23+5:30
रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघात प्रचाराचा धुरळा उडत आहे. रस्त्यावरील प्रचार करतानाच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी सोशल मीडियावरही प्रचाराचा वेग वाढविला आहे.
आविष्कार देसाई, अलिबाग
रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघात प्रचाराचा धुरळा उडत आहे. रस्त्यावरील प्रचार करतानाच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी सोशल मीडियावरही प्रचाराचा वेग वाढविला आहे. कमी वेळात विशेष करुन तरुणांपर्यंत पोचून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे.
पूर्वी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना प्रचंड प्रमाणात मेहनत घ्यावी लागायची. आपल्या पक्षाची भूमिका पटवून सांगायला तसेच त्यांचे मन जिंकण्यासाठी त्यांना त्यांचे उंबरठे झिजवावे लागायचे. काळ बदलला की सर्वच बदलते, त्यामुळे आता निवडणुकाही बदललेल्या असून मतदारराजाही बदलला आहे, तसेच त्यांच्यापर्यंत पोचण्याचे तंत्रही आता बदलले आहे.
सोशल मीडिया हे मतदारांशी थेट संपर्क साधण्याचे प्रभावी साधन झाले आहे. एखाद्या पक्षाने एखादा दावा केला तरी, त्याला जाब विचारणारे दुसऱ्या क्षणाला मोठ्या संख्येने उभे राहताना दिसून येतात. सध्या काँग्रेस, शेकाप, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेने आपआपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी इंटरनेटवर धडक मारीत तेथेही प्रचाराचे रान पटविले आहे. पक्षाची धोरणे, भविष्यात करण्यात येणारी विकास कामे, केलेली विकास कामे, तसेच विरोधी पक्षांची उणी-दुणीही येथे काढण्यात येताना दिसून येते. राजकीय पक्षांतील नेत्यांबाबत काही स्लोगन्स्, त्यांचे फोटोही येथे झळकत असून त्याबाबत बऱ्या वाईट प्रतिक्रिया, लाईक, शेयरिंगही त्याला मिळत आहे.