दोन गाड्यांची पुनर्बांधणी : आठवडाभरात सात गाड्या प्रवाशांच्या सेवेत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे चेंबुर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक या मार्गावर चालविल्या जाणाऱ्या सात मोनोरेलपैकी दोन मोनोरेलची पुनर्बांधणी भारतातच करण्यात आली आहे. सध्या धावणाऱ्या सहा मोनोरेलमध्ये आठवड्याभरात आणखी एका मोनोरेलची भर पडेल. परिणामी, या मार्गावर एकूण सात मोनोरेल प्रवाशांच्या सेवेसाठी धावतील.
चेंबुर ते वडाळा आणि वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या मार्गावर प्रवाशांची वाढती संख्या पाहता भविष्यात या मार्गावर दोन मोनोरेलमधील अंतर १५ ते १८ मिनिटांवर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. डिसेंबर २०१८ रोजी स्कोमी आणि एल अँड टी कंपनीकडे मोनोरेलच्या देखभाल-दुरुस्तीचे काम असताना मोनो तोट्यात होती. स्कोमी डबघाईला आली होती. एमएमआरडीएसोबत झालेल्या कंत्राटानुसार काम सुरू नव्हते. अपघात होत होते. १० पैकी २ मोनोरेल बाद झाल्या होत्या. त्यातच एका मोनोरेलला आग लागली. परिणामी, डिसेंबर २०१८ रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने एक धाडसी निर्णय घेतला.
या निर्णयानुसार, एमएमआरडीएने मोनोरेलचा ताबा आपल्याकडे घेतला. तेव्हापासून ‘आत्मनिर्भर’तेवर भर देण्यात आला. मोनोरेलची पुनर्बांधणी करताना देशातील स्पेअरपार्ट्स वापरण्यात आले. तशा मॅन्युफॅक्चरशी बोलणी सुरू झाली. आयआयटीची मदत घेण्यात आली. दोन वर्षांच्या मेहनतीनंतर दोन मोनोरेलची पुनर्बांधणी भारतात करण्यात आली आहे.
* दाेन वर्षांच्या प्रयत्नांना यश
देशातच बनविलेली मोनोरेल पाहिजे यावर आमचा भर होता. यासाठी देशातच स्पेअरपार्ट्स बनविणारे मॅन्युफॅक्चर शोधा, असे निर्देश आम्ही दिले होते. त्या दिशेने काम सुरू होते. तेव्हा कुठे दोन वर्षांनंतर आम्ही या टप्प्यावर आलो आहोत. मोनोरेल ही सार्वजनिक सेवा असल्याने ती तोट्यात आहे का? याकडे लक्ष देण्यापेक्षा तिचा वापर जास्तीतजास्त व्हावा, प्रवासी कसे वाढतील? याकडे आम्ही लक्ष केंद्रित करीत आहोत. सोलारसाठी काम सुरू आहे. मोनोरेलच्या खांबांवर जाहिरातींसाठी प्रयत्न केले जात आहेत. दोन मोनोंमधील अंतर १५ ते १८ मिनिटे करण्यावर भर दिला जात आहे.
- आर. ए. राजीव,
महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
* अशी धावते माेनाे
- चेंबुर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक
- भविष्यात दोन मोनोरेलमधील अंतर १५ ते १८ मिनिटांवर आणण्याचा प्रयत्न.
-------------