देशमुख-वाझे आमने-सामने; न्या.चांदीवाल आयोगासमोर दोघांमध्ये दोन तास सवाल-जवाब
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 10:05 AM2022-01-22T10:05:23+5:302022-01-22T10:05:44+5:30
उलटतपासणीदरम्यान स्वत: वाझे यांनी देशमुख यांना प्रश्न केले आणि देशमुख यांनी त्यांची उत्तरे दिली
मुंबई : न्या. कैलास चांदीवाल आयोगासमोर शुक्रवारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात दोन तास सवाल-जवाब झाले. उलटतपासणीदरम्यान स्वत: वाझे यांनी देशमुख यांना प्रश्न केले आणि देशमुख यांनी त्यांची उत्तरे दिली.
वाझे यांचे वकील अनुपस्थित असले तरी स्वत: वाझेंनीच देशमुख यांची उलटतपासणी करीत गृहमंत्र्यांचे अधिकार काय असतात, गृह विभागाची रचना कशी असते, याबाबतचे प्रश्न देशमुख यांना केले. तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या कथित खंडणी वसुलीच्या आरोपांची चौकशी चांदीवाल आयोग करीत आहे. तेव्हादेखील सहपोलीस आयुक्तपदी असलेले मिलिंद भारंबे यांना साक्षीसाठी आयोगासमोर बोलवावे, अशी मागणी सचिन वाझे यांनी आज आयोगास केली. त्यावर आता न्या. चांदीवाल सोमवारी काय निर्णय देतात, याबाबत उत्सुकता आहे.
वाझे यांच्या प्रश्नात देशमुख यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सांगितली. गृहमंत्री असताना आपण संजीव पलांडे यांना स्वीय सचिव म्हणून कोणामार्फत आपल्या कार्यालयात नेमले होते हे आठवत नाही. महसूल विभागात त्यांची कामगिरी चांगली असल्याची माहिती मला मिळाली. त्यावेळी मी स्वीय सचिवपदासाठी चार-पाच नावांचा विचार केला होता, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.
पोलीस विभागाची रचना, पोलीस महासंचालकांचे अधिकार, सहपोलीस आयुक्त मुंबई यांचे रिपोर्टिंग कोणाला असते वगैरे प्रश्न वाझे यांनी केले. देशमुख यांनी त्यास उत्तरे दिली. पलांडे हे आपल्या कार्यालयातील महत्त्वाची व गोपनीय कागदपत्रे हाताळत असत, असे त्यांनी सांगितले.