Join us

आता, राऊतांंची वाटचाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बुडविण्याकडे, म्हात्रेंचा असाही टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 3:28 PM

निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाची माहिती देताना म्हटले आहे की, आता देशात भाजप, काँग्रेस, माकप, बहुजन समाज पक्ष, नॅशनल पीपल्स पार्टी, आप या सहा पक्षांनाच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे.

मुंबई - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रमुख असलेल्या आम आदमी पक्षाला  निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. तर, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार अध्यक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अध्यक्ष असलेला तृणमूल काँग्रेस पक्ष तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) या तीन पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आयोगाने काढून घेतला आहे. हा आदेश निवडणूक आयोगाने सोमवारी जारी केला. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या एनसीपीचा राष्ट्रीय दर्जा काढल्याने हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जातोय. त्यावरुन, आता टीकाही केली जातेय.  शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्या शितल म्हात्रे यांनी ट्विट करुन संजय राऊतांवर निशाणा साधलाय.

निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाची माहिती देताना म्हटले आहे की, आता देशात भाजप, काँग्रेस, माकप, बहुजन समाज पक्ष, नॅशनल पीपल्स पार्टी, आप या सहा पक्षांनाच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व तृणमूल काँग्रेसला अनुक्रमे नागालँड व मेघालय या राज्यांत राज्य पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. या दोन राज्यांत काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षांनी केलेल्या कामगिरीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढण्यात आल्यामुळे सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीला खासदार संजय राऊत हेच जबाबदार आहेत, अशी टीका शिंदे गटाकडून सातत्याने होत असते. तर, शरद पवारांच्या सांगण्यावरुनच त्यांनी शिवसेना संपवली असाही आरोप केला जातो. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी ट्विट करुन संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरेंचा पक्ष, चिन्ह विश्वप्रवक्त्यांनी बुडवलं. आता राऊतांची वाटचाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बुडवण्याच्या दृष्टीने आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून रा.काँ.प. दर्जा रद्द करुन याची सुरुवात तर झालीय, असे शितल म्हात्रे यांनी ट्विट करुन म्हटलंय. म्हात्रे यांनी राऊतांसह राष्ट्रवादी काँग्रेसवरही एकप्रकारे बोचरी टीका केलीय. 

टॅग्स :संजय राऊतराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाउद्धव ठाकरे