मुंबई - येत्या नवरात्री निमित्त घटस्थापने च्या पहिल्या दिवस 10 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत मुंबईत ठिकठिकाणी गरबा दांडियाचे आयोजन केले जाणार आहे. मात्र शास्त्रीय पद्धतीने गरबा दांडिया कसा खेळला पाहिजे याची सविस्तर माहिती किंवा प्रशिक्षण अनेकांना नसते.त्यामुळे संगीताच्या तालावर रंगून गरबा दांडिया रास खेळल्यानंतर अनेकांना अंगदुखी, गुडघे दुखीचा किंवा पाठ दुखीचा त्रास होतो.त्यामुळे खास दिंडोशी येथील 4 वर्षांपासून ते अगदी 75 वर्ष वयोगटापर्यंत हौशी गरबा दांडिया प्रेमीसाठी मोफत वर्कशॉपचे आयोजन येत्या रविवार, ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० ते ९.०० वा पर्यंत मालाड पूर्व कुरार व्हिलेज येथील पारीख नगर येथील महापालिका शाळेच्या सभागृहात केले आहे.
गरबा व दांडिया प्रेमींसाठी खास मोफत वर्कशॉपचे आयोजन शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद,आमदार,माजी महापौर सुनील प्रभू यांनी दिंडोशी विधानसभा व आनंद शिल्पकार यांच्या शिल्पकार कलामंच यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार, ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० ते ९.०० वा पर्यंत केलं आहे.
या वर्कशॉपमध्ये गरबा-दांडिया’चे विविध प्रकार शिकवले जाणार आहेत. ज्यामध्ये हाताने खेळल्या जाणाऱ्या पोपट, मोर, देढिया, गामठी या गरब्याच्या प्रकारांसोबत गुजरातच्या कच्छ आणि सौराष्ट्र या भागांत खेळल्या जाणाऱ्या रासचे विविध प्रकार म्हणजेच दांडा रास, मंडला रास, लता रास यांचा समावेश यामध्ये आहे.सोबतच गरब्याचाच भाग असणारी लोकनृत्य टिप्पणी, हल्लीसका, डांगी नृत्य, हुडो, ढोली नृत्य, मुतुकडी, मंजिरा किंवा पधार नृत्य येथे मुलांकडून विशेष मेहनत घेऊन प्रशिक्षिकांमार्फत शिकवली जाणार आहे.सध्या तरुणाईमध्ये विशेष पसंती दर्शवणारा फिल्मी गाण्यांच्या ठेक्यावर ताल धरणारा ‘मॉडर्न गरबा’, याशिवाय सरळ दांडी, उलटी दांडी,चार दांडी, आठ दांडी, बारा दांडी, धमाल दांडी या दांडियाच्या विविध प्रकारांसोबत ‘फोक’ दांडिया डान्स, ‘साल्सा’ दांडिया डान्स, पल्ली जग गरबो, गोप रास वगरे दांडिया नृत्याचे प्रकार येथे आलेल्या गरबा प्रेमींना शिकवले जातील.तसेच गरबा नृत्याला अधिक फुलवणाऱ्या पेहरावाबाबतही या शिबिरांमध्ये चोख मार्गदर्शन केले जाणार असून गरबा-दांडिया खेळतानाचा पेहराव कसा असावा, तो कसा परिधान करावा इथपासून ते त्या पेहरावाच्या रंगापर्यंत अचूक मार्गदर्शन मुलांना दिले जाणार असल्याची माहिती शिल्पकार यांनी दिली.
नवरात्र उत्सव हा गाभा, उत्साह, ऊर्जा, संस्कृती-परंपरा जतन करण्याची भावना असल्याचे आमदार सुनील प्रभू यांनी सांगितले. पण अनेक गरबा रसिक आहेत ज्यांना काही केल्या गरबा आणि दांडिया जमेना तर हे सहज आणि सोपे करण्यासाठी शिल्पकार कला मंच यांच्या माध्यमातून दिंडोशी गरबा - दांडिया वर्कशॉपचे आयोजन केले असल्याची माहिती त्यांनी शेवटी दिली.