मुंबई - देशातील बँकिंग क्षेत्रातील मोठे घोटाळे एकापाठोपाठ एक उघड होत असताना आता बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये असाच एक घोटाळा समोर आला आहे. थकीत कर्जा प्रकरणी उद्योगपती अमित सिंगला आणि अन्य व्यक्तींविरोधात बँक ऑफ महाराष्ट्रने सीबीआयकडे एफआयआर नोंदवला आहे. सिंगला यांच्या आशीर्वाद ग्रुपच्या कंपन्यांनी बँकेकडून 9.5 कोटींचे कर्ज घेतले होते. त्या कर्जाची परतफेड न झाल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.
आशीर्वाद चेनचे मालक अमित सिंगला त्याचे वडिल रोशन लाल आणि आई सुमित्रा देवी या प्रकरणात आरोपी आहेत. कर्ज मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करुन गुन्हेगारी कारस्थान रचल्याचा आरोप बँकेने एफआयआरमध्ये केला आहे.
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये घोटाळा
नवी दिल्लीत सीबीआयनं एका हिरे व्यापऱ्याविरोधात फसवणूकीची केस दाखल केली आहे. या हिरे व्यापऱ्यानं बँकेत 390 कोटी रुपयांचा महाघोटाळा केल्याचे समोर आलं आहे. 390 कोटी रुपयांचा हा महाघोटाळा ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) या बँकेत झाला आहे. सीबीआयनं कथित महाघोटाळ्याप्रकरणी द्वारकादास सेठ इंटरनेशनल प्रा. लिमिटेड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयनं ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सच्या तक्रारीनंतर ही कारवाई केली आहे.
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सने सीबीआयकडे सहा महिन्यापूर्वी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कंपनीचे संचालक सभ्य सेठ, रीता सेठ, कृष्ण कुमार सिंह, रवी सिंह आणि कंपनी द्वारका दास सेठ एसआयजेड इनकॉर्पोरेशन यांची नावे आहेत. द्वारकादास सेठ इंटरनेशनल प्रा. लिमिटेडने ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) या बँकेतून 2007 ते 2012 दरम्यान 390 कोटींचं कर्ज घेतले होते.