Join us

आता घर घेताना ज्येष्ठांची फसवणूक होणार नाही; महारेराने गृहनिर्माणसाठी जाहीर केला मसुदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2024 10:15 AM

ज्येष्ठांच्या गरजांनुसार इमारतींशी संबंधित सर्वच अंगांचा विचार करून तरतुदी सुचविल्या आहेत.

मुंबई : ज्येष्ठांसाठीचे गृहनिर्माण प्रकल्प त्यांच्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊनच बांधावे, या हेतूने महारेराने गृहनिर्माण प्रकल्पांसाठी आदर्श मार्गदर्शक तत्त्वांच्या आदेशाचा मसुदा जाहीर केला आहे. ज्येष्ठांच्या गरजांनुसार इमारतींशी संबंधित सर्वच अंगांचा विचार करून तरतुदी सुचविल्या आहेत. हा आदेश लागू झाल्यानंतर बिल्डरना या तरतुदींचा विक्री करारात समावेश करावा लागणार आहे. त्यामुळे विशिष्ट प्रकल्प आदर्श मार्गदर्शक तत्त्वांनुसारच बांधावे लागतील. त्यासाठी हा मसुदा महारेराच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, याबाबत सूचना आणि मते २९ फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे  आवाहन केले आहे.

सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठीच्या प्रकल्पाच्या चुकीच्या पद्धतीने जाहिराती येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यातून गुंतवणूकदारांची दिशाभूल होण्याची शक्यता असून, त्यातून मूळ हेतूच साध्य होणार नाही. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक या गृहनिर्माण प्रकल्पात प्रत्यक्षात राहायला गेल्यानंतर त्यांना अपेक्षित  सोयीसुविधा उपलब्ध असाव्यात, हा महारेराचा हेतू आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने याबाबतची आदर्श मार्गदर्शक तत्त्वे यापूर्वी जारी केली आहेत.

महत्त्वाच्या तरतुदी :

  एका मजल्यापेक्षा जास्त मजल्यांच्या इमारतीला लिफ्ट. 

इमारतीच्या परिसरात व्हीलचेअरवर फिरता यावे. 

 रॅम्पसची व्यवस्था असावी.

 दरवाजाचे हँडल्स, कड्या सहजपणे व्यवस्थित पकडता येतील, असे आणि दणकट असावे. 

 सर्व लिफ्टला द्रकश्रव्य व्यवस्था असावी. 

 जिन्यांची रुंदी १५०० एमएमपेक्षा कमी नसावी. शिवाय जिन्याच्या दोन्ही बाजूला हँडल्स असावे.

 दोन पायऱ्यांमधील अंतरही कमी असून १२ पायऱ्यांपेक्षा मोठा जिना नको.

 काॅरिडाॅरमध्ये पायऱ्या नको. 

 स्वयंपाकघरात गॅस प्रतिरोधक यंत्रणा असावी. 

टॅग्स :मुंबई