लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यासह मुंबईत म्युकरमायकोसिसचे संकट गडद होत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात या आजाराचे दोन हजारांहून अधिक रुग्ण आहेत. त्यामुळे राज्यासह सर्व पातळ्यांवर या आजाराच्या नियंत्रणासाठी यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयाने म्युकरमायकोसिससाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, सध्या या रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या ३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.हेमंत देशमुख यांनी सांगितले, काेराेनाच्या पहिल्या लाटेत या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण तुरळक होते. मात्र, आता स्थिती काहीशी गंभीर आहे. त्यामुळे लवकर शोध, निदान आणि उपचार या त्रिसूत्रीवर काम सुरू आहे. बरेच रुग्ण हा आजार अंगावर काढतात. नंतर गुंतागुंत निर्माण झाल्यावर रुग्णालयात येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रुग्ण किंवा नातेवाईक, कुटुंबीयांनी असे न करता, कोणतेही घरगुती उपाय करण्यात वेळ न घालवता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. या आजारावरील इंजेक्शन महागडे आहे, त्यासाठी रुग्णालय प्रशासनाने क्राउड फंडिगचा पर्यायही निवडला असून, विविध पातळ्यांवरून मदत स्वीकारली जात आहे.
* इंजेक्शनचा तुटवडा पडू नये, यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील
नायर रुग्णालयाने विविध वैद्यकीय शाखांतील तज्ज्ञांना हाताशी घेऊन या आजाराविरोधात लढण्यासाठी चमू तयार केला आहे. त्यात भूलतज्ज्ञ, कान, नाक, घसा तज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, मेंदूविकारतज्ज्ञ, विषाणूतज्ज्ञ अशा तज्ज्ञांचा समावेश आहे. याविषयी नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.रमेश भारमल यांनी सांगितले की, पालिका रुग्णालयांसह कोविड केंद्रात या आजाराचे लवकर निदान, उपचारांवर भर दिला जात आहे. म्युकरमायकोसिस या आजारावर औषधोपचारासाठी इंजेक्शनचा तुटवडा पडू नये, यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करत आहे.
............................................