मुंबई
एसटी कर्मचाऱ्यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानात शिरुन दगडफेक आणि चप्पलफेक केल्याच्या प्रकरणाचं खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांकडून आंदोलकांच्या कृतीचं निषेध व्यक्त होत असतानाच आता भाजपा नेते आणि माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. "शरद पवारांचे वाईट दिवस सुरू झालेत", असं विधान अनिल बोंडे यांनी केलं आहे. तसंच आता शरद पवार यांनीच राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायला हवी असंही म्हटलं आहे.
अनिल बोंडे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर व्हिडिओ पोस्ट करत शरद पवारांवर टीका केली आहे. "शरद पवारांचे शेवटचे दिवस वाईट सुरू झाले आहे. फ्रान्सच्या राजाला जनतेने भर चौकात फाशी दिली होती त्याचीच थोडीफार पुनरावृत्ती महाराष्ट्रमध्ये होत आहे. शरद पवार यांनी जाहीर केले पाहिजे राज्यात माझीच सुरक्षा नाही तर जनतेच काय? त्यामुळे त्यांनी राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करावी", असं ट्विट अनिल बोंडे यांनी केलं आहे.
"शरद पवारांचे शेवटचे दिवस सुरू झालेत. फ्रान्सच्या राज्यक्रांतीमध्ये राजाला शेतकऱ्यांनी, कामगारांनी चौकात आणून फासावर लटकवलं होतं. त्याचीच थोडीफार प्रमाणात पुनारवृत्ती महाराष्ट्रात पाहायला मिळाले. एसटी कर्मचारी पवारांच्या घरात घुसले. कारण त्यांना गेल्या ५ महिन्यापासून पगार मिळालेला नाही. हे सरकार इतकं अहंकारात गेलं आहे की अनिल परब म्हणाले पाच महिने संपाचा काय फायदा झाला असं म्हणतात. तर संजय राऊत ईडीची नोटीस येते म्हणून स्वत:चं स्वागत करुन घेतात. नवाब मलिकांचे देशद्रोह्याशी संबंध असताना महाराष्ट्राच्या छाताडावर सांगतात आम्ही राजीनामा घेणार नाही. शेवटी हायकोर्टाच्या निकालानंतरही अपमानीत होणारे कामगार त्यांना माहित आहे हे सरकार हलतं ते शरद पवारांच्या कृतीमुळे. जोपर्यंत आपण पवारांना हलवत नाही तोवर काही होणार नाही. त्यामुळेच हे सर्व अराजक निर्माण झालं ते पवारांमुळेच झालं आहे", असं अनिल बोंडे म्हणाले.
"आता शरद पवारांनीच स्वत: सांगितलं पाहिजे की जर मीच सुरक्षित नाही. तेव्हा या राज्यात कुणाचीच सुरक्षा नाही. त्यामुळे या राज्यात राष्ट्रपती राजवट लावायची शिफारस करायला हवी", असंही ते म्हणाले.