आता ‘ती’ नव्हे ‘तो’ ललित!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 02:09 AM2018-05-26T02:09:59+5:302018-05-26T02:09:59+5:30
बीडच्या कॉन्स्टेबल ललिता साळवे यांच्यावर अखेर शुक्रवारी सेंट जॉर्ज रुग्णालयात लिंगपरिवर्तनाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. ता ललितची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बीडच्या कॉन्स्टेबल ललिता साळवे यांच्यावर अखेर शुक्रवारी सेंट जॉर्ज रुग्णालयात लिंगपरिवर्तनाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. शुक्रवारी सकाळी ८.३० च्या सुमारास सुरू झालेली ही शस्त्रक्रिया तब्बल चार तासांनी संपली. सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या प्लॅस्टिक सर्जरी विभागाचे डॉ. रजत कपूर यांच्यासह डॉक्टरांच्या चमूने ही शस्त्रक्रिया केली. आता ललितची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
त्याच्या अविकसित जननेंद्रियावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जेणेकरून दोन-तीन आठवड्यांनंतर तो पुरुषांप्रमाणे मूत्र विसर्जित करू शकेल. सध्या मूत्रविसर्जनासाठी जननेंद्रियाला एक लहानशी ट्यूब लावण्यात आल्याची माहिती डॉ. रजत कपूर यांनी शुक्रवारी रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या शस्त्रक्रियेनंतर काही काळ त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले होते, मात्र आता प्रकृती ठीक आहे. पुढचे तीन दिवस ललितला कुणालाही भेटता येणार नाही. परंतु, ललितचे वय कमी असल्याने तो लवकर रिकव्हर होईल, असेही डॉ. कपूर यांनी सांगितले.
आता सहा महिन्यांच्या अंतरानंतर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. काही महिन्यांनंतर मूत्रविसर्जनाचे कार्य व्यवस्थित होत आहे का याची तपासणी केली जाईल. त्यानंतर दाढी-मिशांकरिता केस प्रत्यारोपणाची प्रक्रियाही करण्यात येईल.
सातव्या वर्षी झाली ‘तो’ असल्याची जाणीव
ललितला सातव्या वर्षी आपण पुरुष असल्याची जाणीव झाली होती, अशी माहिती या वेळी डॉक्टरांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र याविषयी निर्णय घेईपर्यंतची प्रक्रिया व त्याची कारणे भिन्न असू शकतात, असे नमूद करून त्याबद्दल कुटुंबीय अधिक सांगू शकतील, असे डॉक्टर म्हणाले.
उपचार मोफत : पहिल्यांदाच या रुग्णालयात अशा प्रकारे लिंगपरिवर्तनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात दीड लाखांपर्यंत खर्च येतो. मात्र शासकीय रुग्णालयात या प्रक्रियेचा खर्च एक लाखाच्या आत शक्य होतो. ललितच्या प्रकरणात कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसून मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
- डॉ.मधुकर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय
या प्रकरणाचे ‘डॉक्युमेंटेशन’
वैद्यकीय शिक्षणात या प्रकरणाचा अभ्यास करता यावा, याकरिता ललितच्या संपूर्ण लिंगपरिवर्तनाच्या प्रक्रियेचे डॉक्युमेंटेशन करण्यात येत आहे. शस्त्रक्रियेपूर्वीची छायाचित्रे, त्यानंतरची छायाचित्रे, प्रक्रियेदरम्यानचे दस्तऐवज सगळ्याचे डॉक्युमेंटेशन करण्यात येत आहे. मात्र यासाठी ललितची लेखी परवानगी घेतली आहे. शिवाय, त्यात काही आक्षेपार्ह आढळल्यास त्याच्या म्हणण्यानुसार ते काढून टाकण्यात येईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
रुग्ण फिट असल्याने आव्हान टळले
रुग्णाच्या शस्त्रक्रियेपूर्वी वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात तो मानसिक व शारीरिकरीत्या फिट असल्याचे आढळले. त्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान भूल देणे अत्यंत सोपे गेले. शस्त्रक्रियेकरिता संपूर्ण शरीराला भूल देण्यात आली होती.
- डॉ. संतोष गीते, भूलतज्ज्ञ