मुंबई : जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी थेट आमदारांनाच दीड कोटी रुपयांची लाच मागितल्याचे प्रकरण बुधवारी विधानसभेत गाजले. ‘किशोर भोयर नामक अधिकाऱ्याने आपल्याला हे प्रमाणपत्र देण्यासाठी तब्बल दीड कोटी रुपयांची लाच मागितली असा आरोप शिवसेनेचे मेहकर (जि.बुलडाणा) येथील आमदार संजय रायमूलकर यांनी केला. त्याची तत्काळ दखल घेत भोयर यांना निलंबित करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि ग्रामपंचायत सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत एक वर्षापर्यंत वाढवून देण्यास मंजुरी देणारे विधेयक यावेळी विधानसभेत मंजूर करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविणा-या उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बारा महिन्यांची मुदतवाढ देणारे विधेयक मांडण्यात आले.