Join us

माकडांचे खेळ खूप झाले, आता शिवसेना अ‍ॅक्शन मोडमध्ये; संजय राऊतांचा भाजपाला थेट इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 3:01 PM

पोलीस त्यांचं काम व्यवस्थित करतील. मुंबई पोलीस काही ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्ससारखे केंद्राचे बाहुले नाहीत, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

मुंबई-राज्यात कायद्याचं राज्य आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याबाबत कोर्टानं दिलेला निकाल कायद्यानं दिलेला निकाल आहे. सरकारचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. पोलीस त्यांचं काम व्यवस्थित करतील. मुंबई पोलीस काही ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्ससारखे केंद्राचे बाहुले नाहीत, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. 

राणा दाम्पत्याला आज वांद्रे कोर्टात हजर करण्यात आलं. न्यायालयानं दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राणा दाम्पत्य आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली. तसंच आता माकडांचे खेळ खूप झाले. शिवसेना अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे, असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला. 

"तुम्ही 'मातोश्री'ची रेकी करता मग आम्ही काय बघत बसायचं का? रेकी करता आली नाही, शिवसैनिकांनी डाव हाणून पाडला ती गोष्ट वेगळी. पण अशा प्रकारचे धंदे तुम्ही करणार असाल तर शिवसैनिक शांत बसणार नाही. प्रत्येक शिवसैनिक बर्हिजी नाईक आहे. त्यामुळे मातोश्रीवर घुसणं इतकं काही सोपं काम नाही", असं संजय राऊत म्हणाले. 

खार पोलिसांनी काय क्रांतीकारकांना अटक केलीय का?"खार पोलिसांनी काय क्रांतीकारकांना अटक केली का? की त्यांना पाहायला तिथं जायचं होतं यांना. खोट्या जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करुन खासदार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अशा आरोपीला दुसरा आयएनएस विक्रांत घोटाळ्यातील आरोपी भेटायला जातो. पोलिसांनी काय त्यांचं काम करायचं नाही का? दोन्ही आरोपी असून अशा आरोपींना झेड आणि वाय दर्जाची सुरक्षा कशी काय दिली जाते. देशद्रोही माणसाला दगड मारण्याची परंपराच आहे. मग ज्याला दगडाची भाषा कळते त्यांना दगडानेच उत्तर दिलं जातं", असं संजय राऊत म्हणाले. 

"राज्यात महाविकास आघाडीचं सरकार पडत नाही म्हणून अशी स्टंटबाजी करायची आणि त्यावर पोलिसांनी कारवाई केली की राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवटीची मागणी करायची हा असला पोरखेळ विरोधी पक्षाचा सुरू आहे. यांची अवस्था बकरीच्या शेपटीवरच्या माशी प्रमाणे झाली आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या हातात काहीच नाही. तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही फक्त राज्यपालांना हाताशी घेऊन राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट आणणं ही काही सोपी गोष्ट वाटली का?", असंही संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाभाजपानवनीत कौर राणा