मुंबई: महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या निवडणुकीत ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे चिरंजीव व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणुक लढविणार आहेत. मात्र आदित्य ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वरळीमध्ये विविध ठिकाणी म्हणजे गुजराती, तेलगू भाषेत मोठे होर्डिंग्स लावण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर आदित्य ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
वरळीमध्ये मराठी मतदारांसोबतच इतर भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न होताना दिसून येत आहे. यासाठी शिवसेनेने वरळी मतदारसंघात मोठे मोठे होर्डिंग्स लावण्यात आले. यात विशेष म्हणजे गुजराती, तेलगू भाषेत लावलेल्या या होर्डिंग्समुळे आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. सोशल मीडियावर हाच का शिवसेनेचा मराठी बाणा असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे आता शिव वडापाव नाही, तर खमण ढोकळा घ्या असं बोलत कार्यकर्त्यांना देखील वडापाव न देता खमण ढोकळा द्या अशी टीका करण्यात आली आहे.
तसेच शिवसेनेच्या या भूमिकेवर विरोधी पक्षांनीही आदित्य ठाकरेंना टीकेचं लक्ष्य केलं आहे. सत्तेसाठी कायपण असं म्हणणाऱ्या शिवसेनेवर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तोंडसुख घेतलं आहे. 'कसं काय वरळी'चं रुपांतर 'केम छो वरळी'मध्ये झालंय? युतीत राहून मोठ्या मास्तरांनी गुजरातीचे धडे पण गिरवायला लावले का? कुठे गेला मराठी माणसांचा न्याय हक्क? कुठे गेला मराठी बाणा आणि कणा? अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.