आता युतीसाठी शिवसेनेलाही दोन पावलं पुढं यावं लागेल- देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 06:05 IST2018-05-31T19:12:06+5:302018-06-01T06:05:03+5:30

या निवडणुकीमुळे भाजपा आणि शिवसेनेत कडवटपणा निर्माण झाला.

Now Shivsena should take initiative for alliance with BJP Says CM Devendra Fadnavis | आता युतीसाठी शिवसेनेलाही दोन पावलं पुढं यावं लागेल- देवेंद्र फडणवीस

आता युतीसाठी शिवसेनेलाही दोन पावलं पुढं यावं लागेल- देवेंद्र फडणवीस

 मुंबई : पालघरच्या निवडणुकीवरून भाजपा-शिवसेनेदरम्यानची कटुता अधिकच वाढली असताना झाले गेले विसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आगामी निवडणुकांत शिवसेनेशी युती करण्यास आणि त्यासाठी चर्चा करण्यास भाजपा तयार असल्याचे सांगितले.
पोटनिवडणूक निकालानंतर आयोजित पत्रपरिषदेत मुख्यमंत्री म्हणाले की, भाजपा आणि शिवसेना हे अनेक मुद्द्यांबाबत समविचारी पक्ष आहेत. त्यामुळे ते वेगळे लढले तर दोन्ही पक्षांचे नुकसान होईल. शिवसेना युतीबाबत आज जे काही बोलत आहे त्याने त्यांचे नुकसानच होणार असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
पालघरमध्ये ज्या प्रकारे युतीतील दोन पक्षांमध्ये कटुता आली ती क्लेशदायक होती आणि ती टाळता आली असती तर आनंदच झाला असता. युतीतील दोन पक्षांनी अशा पद्धतीने निवडणूक लढवावी का याचे चिंतन करण्याची गरज आहे. पण आता ते सगळे संपले आहे. आमची युतीची तयारी आहे आता भूमिका शिवसेनेला घ्यायची आहे.
भंडारा-गोंदियातील निकालाविषयी ते म्हणाले, त्या ठिकाणी एक वर्षापासून दुष्काळ असून त्यामुळे सरकारविषयीचा रोष असू शकेल. हीच निवडणूक पावसाळ्यानंतर झाली असती तर निकाल वेगळा लागला असता. मी पराभव स्वीकारतो आणि नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांचे अभिनंदन करतो. ते नऊ महिन्यांसाठी खासदार झाले आहेत. राष्ट्रवादी त्यांना पुन्हा संधी देणार नाही, हे स्पष्टच आहे. २०१९ची लोकसभा निवडणूक तेथे भाजपाच शंभर टक्के जिंकेल.
ईव्हीएममधील बिघाडाने
भाजपाचेही नुकसान
दोन्ही ठिकाणी ईव्हीएममधील बिघाडाचा फटका हा भाजपाला बसला. कारण आमचा सुशिक्षित मतदार सकाळी मतदानाला येतो. अशावेळी ईव्हीएम बंद असेल तर तो पुन्हा येत नाही. मात्र अन्य राजकीय पक्ष आणि माध्यमांनीही ईव्हीएममध्ये बिघाड जणू भाजपानेच केला आणि ईव्हीएमचे उत्पादन भाजपानेच केल्याच्या आवेशात आमच्यावर दिवसभर झोड उठवली, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ईव्हीएम बिघाडाची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.

Web Title: Now Shivsena should take initiative for alliance with BJP Says CM Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.