Join us

खूशखबर! लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना करता येणार शॉपिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 10:34 AM

पश्चिम रेल्वेच्या 16 मेल आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये ही सेवा सुरू केली जाणार आहे. यासाठी एचबीएन प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीला 5 वर्षांसाठी 3.66 कोटी रुपयांमध्ये कंत्राट देण्यात आले आहे.

ठळक मुद्देलांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात प्रवाशांसाठी लवकरच शॉपिंगची सेवा सुरू करण्यात येणार आहे.पश्चिम रेल्वेच्या 16 मेल आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये ही सेवा सुरू केली जाणार आहे. एचबीएन प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीला 5 वर्षांसाठी 3.66 कोटी रुपयांमध्ये कंत्राट देण्यात आलं आहे.

मुंबई - रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता एक खूशखबर आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात प्रवाशांसाठी लवकरच शॉपिंगची सेवा सुरू करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या 16 मेल आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये ही सेवा सुरू केली जाणार आहे. यासाठी एचबीएन प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीला 5 वर्षांसाठी 3.66 कोटी रुपयांमध्ये कंत्राट देण्यात आले आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

रेल्वेच्या या नव्या योजनेनुसार ट्रेनमध्ये कंपनीचे दोन सेल्समन असणार आहेत. कंपनीचे ओळखपत्र आणि गणवेशासह हे सेल्समन असतील. त्यासोबत ट्रेनमध्ये शॉपिंग कार्ट उपलब्ध असणार आहे. प्रवासी कॅश सोबतच क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून शॉपिंग करू शकणार आहेत. जानेवारी 2019 च्या पहिल्या आठवड्यात ही सेवा सुरू होईल. एकूण आठ टप्प्यांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात तीन ट्रेनमध्ये ही सेवा सुरू होईल. यापैकी मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेसमध्ये ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. 

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये सौंदर्यप्रसाधने, घरातील आणि किचनमधील साहित्य आणि फिटनेसचं साहित्य इत्यादी वस्तू विकण्याची परवानगी असणार आहे. मात्र तंबाखू, गुटखा आणि सिगारेट या वस्तू विकण्यास परवानगी नाही. प्रवाशांना वस्तू पाहता याव्यात तसेच त्यांची माहितीही मिळवी यासाठी कॅटलॉग देण्यात येणार आहे. ट्रेनमधील सेल्समनला सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत सामान विक्रीची परवानगी असणार आहे. 

टॅग्स :भारतीय रेल्वेपश्चिम रेल्वेरेल्वे