आता मोनोमध्येही जुळणार रेशीमगाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 02:11 AM2020-03-04T02:11:33+5:302020-03-04T02:11:46+5:30
अद्याप मोनोतून अपेक्षेइतका महसूल मिळत नसल्याने संपूर्ण मोनोच लग्नसमारंभासाठी आणि इतर समारंभासाठी भाड्याने देण्याचा निर्णय एमएमआरडीए प्रशासनाने घेतला आहे.
मुंबई : देशातील पहिली मोनोरेल म्हणून ओळख असलेली मोनो आता आर्थिक टंचाईत सापडली आहे. यामुळे मोनोरेलला यातून बाहेर
काढण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आता लग्न समारंभ, वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमांसाठी
मोनोरेल भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. यामधून एमएमआरडीए महसूल उभारणार आहे. मुंबईमध्ये वडाळा ते चेंबूरदरम्यान
आठ किलोमीटर अंतरासाठी २०१३ मध्ये मोनोरेल सुरू करण्यात आली. यादरम्यान अनेकदा बिघाड किंवा यांत्रिक अडचणींमुळेदेखील मोनो बंद राहिली. त्यानंतर ४ मार्च २०१९ रोजी वडाळा ते जेकब सर्कल असा दुसरा टप्पा सुरू झाल्यावर सलग चेंबूर ते जेकब सर्कल अशी १९.५४ किलोमीटरच्या मार्गावर कार्यान्वित झाली. अद्याप मोनोतून अपेक्षेइतका महसूल मिळत नसल्याने संपूर्ण मोनोच लग्नसमारंभासाठी आणि इतर समारंभासाठी भाड्याने देण्याचा निर्णय एमएमआरडीए प्रशासनाने घेतला आहे.
मोनो सुरू झाली तेव्हा या मोनोतून लाखो प्रवासी वापर करतील असा एमएमआरडीएचा अंदाज होता, मात्र अवघे काही हजारच प्रवासी
मोनोने प्रवास करीत होते. गेल्या दोन महिन्यांनंतर परिस्थिती आणखीनच बिकट झाली. यामुळे मोनोतून उत्पन्न खूपच कमी व्हायला लागले. परिणामी, मोनोची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. सध्या मोनोकडे पाच रॅकच असून एकूण ९७ फेऱ्या या दिवसभरामध्ये
होतात, मात्र त्याचा पुरेसा फायदा होताना दिसत नाही. यामुळे एमएमआरडीए प्रशासनाने मोनोरेल भाड्याने द्यायचा निर्णय घेतल्याचे
एमएमआरडीएच्या वतीने स्पष्ट केले आहे. यानुसार लग्न समारंभ, वाढदिवस किंवा इतर समारंभांसाठी बेस्ट बसेसप्रमाणेच मोनोसुद्धा भाड्यावर मिळू शकणार आहे.
>दररोज साडेआठ लाखांचे नुकसान
मोनो प्रकल्पाची किंमत आत्तापर्यंत २७०० कोटी रुपयांच्या घरात गेली आहे, मात्र प्रवासी संख्या प्रचंड घटल्याने मोनोला दिवसाला ८ लाख ५० हजारांचे नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे मोनो रेल विविध कार्यक्रमांसाठी भाड्याने देत महसूल मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.