आता बाईकच्या मागे बसा; पण हेल्मेट नसेल तर दंड भरा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 10:36 AM2022-05-26T10:36:19+5:302022-05-26T10:36:43+5:30

नियम मोडल्यास परवाना ३ महिन्यांसाठी रद्द, १५ दिवसांचा अल्टिमेटम

Now sit on the back of the bike; But if you don't have a helmet, pay the fine! | आता बाईकच्या मागे बसा; पण हेल्मेट नसेल तर दंड भरा!

आता बाईकच्या मागे बसा; पण हेल्मेट नसेल तर दंड भरा!

Next

मुंबई : मुंबईत दुचाकीच्या अपघातांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर बाईकस्वारासह मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास बाईकस्वाराला ५०० रुपये दंड तसेच  चालक परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात येणार आहे. १५ दिवसांनी या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता बाईकस्वारांना आणखी एका हेल्मेटची खरेदी करावी लागणार आहे.  

अपघातांचे वाढते प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने  वाहतूक पोलिसांनी कठोर पावले उचलत कारवाई सुरू केली आहे. वाहतूक पोलिसांनी यापूर्वी आयुक्तांच्या आदेशाने, विरुद्ध दिशेने वाहने चालविणाऱ्या चालकांवर तसेच बेदरकारपणे गाडी चालविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली.  त्याचप्रमाणे विनाहेल्मेटवरील कारवाईचा वेगही वाढत असून दिवसाला १०० ते १५०० जणांवर कारवाई करण्यात येत आहे. ६ एप्रिल ते ७ मे दरम्यान ५६ हजार ४९८ गुन्हे नोंदवत ५ हजार ४४१ जणांचे वाहन परवाने रद्द करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव पाठविला आहे. आरटीओ विभागाकडून त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता बाईकवर मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास ५०० रुपये दंड तसेच ३ महिन्यांसाठी परवाना रद्द करण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे. त्यानुसार, कारवाई करण्यात येईल.

मुंबईत ४५ टक्क्यांहून अधिक अपघात 
     राज्यात घडलेल्या रस्ते अपघातांपैकी तब्बल ४५ टक्क्यांहून अधिक अपघात मुंबईत घडल्याचे समोर आले आहे. १९,३८३ अपघातांपैकी ८,७६८ अपघात हे एकट्या मुंबईत घडल्याचे जानेवारी ते एप्रिल २०२२ दरम्यानच्या आकडेवारीवरून उघड झाले आहे. 
     ५५४ अपघात अहमदनगरमध्ये, पुण्यात ५३९, नाशिकमध्ये ५३६ तर कोल्हापुरात ४०६ अपघात घडले. दरम्यान, कोरोनाकाळात लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर दुचाकींची खरेदी झाली. त्यामुळे मुंबईतील वाहनांची संख्या ४२ लाखांच्याही पुढे गेली असून, त्यात २२ ते २४ लाख दुचाकींचा समावेश आहे.

Web Title: Now sit on the back of the bike; But if you don't have a helmet, pay the fine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.