Join us

आता छोटी कोविड केंद्रे होणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2020 6:07 AM

पालिका प्रशासन; कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत नियंत्रणात आला असल्याने आता कोविड केंद्रांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच बहुतांश संशयित रुग्णांना त्यांच्या घरीच क्वारंटाइन करण्यात येत आहे. त्यामुळे विभागस्तरावर शाळा व हॉटेल येथे तात्पुरत्या स्वरूपात उभारलेले कोरोना काळजी सेंटर - १ व कोरोना काळजी सेंटर - २ हे बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने घेतला. यापुढे कोरोनाबाधित रुग्णांवर जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचार होणार आहेत.

मुंबईत मार्चच्या दुसºया आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर झोपडपट्ट्या व अन्य भागांमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत गेला. झोपडपट्ट्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग शक्य नसल्याने महापालिकेने छोटे-मोठे विलगीकरण कक्ष उभारले. संशयित रुग्णांना ठेवण्यासाठी ३२८ कोरोना काळजी केंद्र १ आणि १७३ कोरोना काळजी केंद्र २ उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यापैकी पाच हजार ४० खाटांच्या क्षमतेची ६० काळजी केंद्रे २ सध्या सुरू आहेत. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता नियंत्रणात येत असून दैनंदिन रुग्णवाढीचा दरही एक टक्क्याहून कमी आहे. तसेच बहुतांशी संशयित रुग्ण घरातच क्वारंटाइन राहण्याची तयारी दाखवत असल्याने या केंद्रांमध्ये आता रुग्णांची संख्या तुलनेने खूप कमी आहे. मनुष्यबळ अधिक आणि रुग्णांची संख्या कमी असल्याने काही छोटी केंद्रे बंद करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.

येथे राहणार उपचार सुरूवांद्रे-कुर्ला संकुलात दोन हजार खाटांची क्षमता असलेले दोन जम्बो कोविड सेंटर, गोरेगाव नेस्को येथे, दहिसर व मुलुंड चेकनाका येथे व महालक्ष्मी रेसकोर्सवर जम्बो कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार यापुढेही गरजेनुसार सुरू राहणार आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस