लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : देशातील पहिल्या एलएनजी (लिक्विफाईड नॅचरल गॅस) इंधनावर रुपांतरित करण्यात येणाऱ्या एस.टी महामंडळाच्या वाहन प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आले.
या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, महाव्यवस्थापक नंदकुमार कोलारकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी एलएनजी रुपांतरणामुळे एसटी बसमधील बदल, डिझेलच्या तुलनेत होणारे लाभ याविषयी माहिती घेतली. एसटी महामंडळातील ५००० डिझेल वाहनांचे एलएनजी या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये रुपांतरण करण्यात येणार आहे.
महामंडळाकडे डिझेलवर चालणारी सुमारे १६००० प्रवासी वाहने आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे ३४ टक्के खर्च डिझेलवर होतो. यामुळे टप्प्याटप्प्याने पूर्ण एस.टी महामंडळातील वाहने एलएनजी इंधनावर आधारित करण्यात येणार आहेत. त्यासाठी महामंडळाच्या सुमारे ९० आगारांत एलएनजी वितरण केंद्रही उभारण्यात येणार आहे.
प्रदूषणामध्ये १० टक्के घट
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने महाराष्ट्रास एलएनजी या पर्यायी इंधनाचा पुरवठा करण्यासाठी मे. किंग्स् गॅस प्रा. लि. यांचेबरोबर सामंजस्य करार केला असून त्यामध्ये परिवहनसाठी देखील एलएनजीचा वापर व पुरवठा याचा समावेश करण्यात आला आहे. डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणामध्ये एलएनजीमुळे सुमारे १० टक्के घट होणार आहे.