Join us

आता महाराष्ट्रातही शाळा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. यामुळे मुलांचे मानसिक, शारीरिक, शैक्षणिक आरोग्य धोक्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. यामुळे मुलांचे मानसिक, शारीरिक, शैक्षणिक आरोग्य धोक्यात आल्याने लवकरात लवकर शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी सातत्याने होत आहे. या विषयावर अनेक परिसंवाद, चर्चा, सोशल मीडियावर #आताशाळासुरूकरा अशा मोहीम सातत्याने सुरू झाल्या आहेत. आता दिल्लीमध्येही शाळा सुरू करण्यात येणार असल्याच्या या निर्णयानंतर या मागणीला जोर मिळाला आहे आणि महाराष्ट्रातही शाळा सुरू करण्याची मागणी शिक्षणतज्ज्ञ, पालक व अभ्यासक करत आहेत.

सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असताना मुले शाळेत जाण्यासाठी आतूर झाली आहेत. समाजमनही शाळा सुरू करण्यासंदर्भात आग्रही आहे. दीर्घकाळ मुलांना शाळेपासून दूर ठेवणे त्यांच्या मानसिक व शैक्षणिक आरोग्याच्या दृष्टीने योग्य होणार नाही, असे मत युनिसेफ, युनेस्को आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनेही नोंदविले आहे. जनजीवन सुरळीत सुरू आहे, बाजार गर्दीने ओसंडून वाहत आहेत. मुले गटागटाने खेळत आहेत. शाळा मात्र गेली दीड वर्षे बंदच आहेत. यासाठी शाळा लवकर सुरू झाल्या पाहिजेत, असा सूर शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यातून उमटत आहे.

कोट

‘युनिसेफ’च्या मते, शाळा बंद असल्याने मुलांवर याचा गंभीर परिणाम झाला आहे. अनेक विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहेत. बालविवाह, बालमजुरीचे प्रमाण वाढले आहे. शाळा सुरू करण्यास विलंब केल्यास त्रासदायक ठरू शकते. अमेरिकेत सुमारे ९० टक्के विद्यार्थी सरकारी शाळांमध्येच शिकतात. तिथेही १६ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मुलांचे लसीकरण निश्चित आवश्यक आहे मात्र जी बाब अजून सुरूच झाली नाही त्यासाठी किती वेळ थांबून राहायचे हा मुख्य प्रश्न आहे. देशात गुजरात, दिल्ली, कर्नाटकसह अनेक राज्ये टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ग्रामीण व शहरी दोन्ही भागातील मागच्या दीड ते दोन वर्षातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा विचार करून शासनाने लवकर शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा.

वसंत काळपांडे, शिक्षणतज्ज्ञ