Join us

आता विद्यार्थी निकालातील गोंधळाने हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 3:04 PM

मुंबई विद्यापीठाच्या लॉ शाखेच्या रखडलेल्या निकालांचे काम आटोपण्यासाठी मुंबई विद्यापीठाने युद्धपातळीवर कामास सुरुवात केली. रखडलेल्या निकालांपैकी काही निकाल जाहीरही करण्यात आले

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या लॉ शाखेच्या रखडलेल्या निकालांचे काम आटोपण्यासाठी मुंबई विद्यापीठाने युद्धपातळीवर कामास सुरुवात केली. रखडलेल्या निकालांपैकी काही निकाल जाहीरही करण्यात आले, मात्र निकालाची टक्केवारी मात्र यात घसरलेली दिसून आली. निकालाचा हा टक्का खूपच कमी असून विद्यापीठाने नैतिक जबाबदारी स्वीकारत पुन्हा मूल्यांकन करावे आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी नापास झालेल्या विद्यार्थ्यांकडून व विद्यार्थी संघटनांकडून होत आहे. 

बॅचलर ऑफ लॉ (एलएलबी) चे सेमिस्टर ६ आणि ४ तसेच मास्टर ऑफ लॉ ( एलएलएम) सेमिस्टर ३ चे  निकाल विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले मात्र यात बराच गोंधळ असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे. लॉ चे  निकाल जाहीर झाल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल परिक्षेत नापास करण्यात आले असून काही जणांना तर चांगले गुण देऊन उत्तीर्ण करण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे प्रॅक्टिकलमध्ये पास झालेले विद्यार्थी लेखी परिक्षेत चक्क नापास झाल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकरणावरून गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीदेखील विद्यापीठाने निकालात गोंधळ घालण्यास सुरूवात केली असल्याचे स्टुडन्ट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी म्हटले आहे. यासंदर्भात लॉ च्या प्राध्यापक रश्मी ओझा यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. 

 आधीच निकाल वेळेत न लागल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. त्यामध्ये जर घाईघाईत निकाल लावण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून नापास केले जात असेल तर हे भयंकर आहे. विद्यार्थ्यांच्या यासंदर्भातील अनेक तक्रारी येत आहेत. विद्यापीठाने याची जबाबदारी घेत पेपर तपासणीची प्रक्रिया पुन्हा पार पडायला हवीसचिन पवार, अध्यक्ष, स्टुडन्ट लॉ कौन्सिल