आता विद्यार्थ्यांसमोर आव्हान प्रवेशाचे; कट ऑफ वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 06:42 AM2019-06-09T06:42:13+5:302019-06-09T06:43:37+5:30
अकरावी प्रवेश । गुण फुगवट्यामुळे विद्यार्थ्यांवर टांगती तलवार
मुंबई : राज्याच्या राज्य शिक्षण मंडळाच्या जाहीर झालेल्या निकालानंतर आता अकरावी प्रवेशासाठी एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांशी टफ फाइट द्यावी लागणार आहे. एकीकडे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासह, इतर मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्यांची संख्या ८० हजारांच्या आसपास आहे. तर दुसरीकडे राज्य शिक्षण मंडळाच्या निकालानुसार दहावीत ९० पेक्षा जास्त टक्के मिळविणाºया विद्यार्थ्यांची संख्या केवळ २५,९४१ इतकी आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांतील अकरावी प्रवेश आता एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी आव्हान ठरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसई या मंडळाच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण दिले जातात. त्यामुळे यंदा या मंडळाच्या नव्वदीपार विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर एसएससी बोर्डाने ते गुण रद्द केल्याने या आकड्यात घसरण दिसून आली. दहावीच्या परीक्षेनंतर अकरावी प्रवेशासाठी इतर मंडळाचे आणि एसएसएसी मंडळाचे विद्यार्थी एकत्रित आल्याने आता या स्पर्धेत राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचा निकाल कमी लागल्याने कस लागणार आहे. मुळातच अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याने नामांकित महाविद्यालयांचा कट आॅफ वाढेल हे निश्चित आहे. त्यातच या कमी निकालामुळे गुणांच्या स्पर्धेत राज्य मंडळाचे विद्यार्थी मागे पडणार आहेत.
यातच मागील वर्षी उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे अल्पसंख्याक महाविद्यालयांमधील जागा या फक्त खुल्या आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे तेथील जागांवर इतर विद्यार्थ्यांना प्रवेशाचा मार्ग बंद होणार आहे. त्यामुळे पुन्हा इतर महाविद्यालयांतील प्रवेशावरील ताण वाढणार असून स्पर्धेच्या तीव्रतेचा फटका एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. याचसोबत यंदा अकरावी प्रवेशासाठी मराठा आरक्षण आणि आर्थिक दुर्बल घटकांतील आरक्षण लागू होणार असल्याने खुल्या गटातील विद्यार्थ्यांच्या जगांत घट होणार आहे. यंदा नवीन महाविद्यालयातील तुकडी वाढ झाली असून जागांत वाढ झाली असली तरी आरक्षणातील जागांमुळे विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेश म्हणजे दिव्य ठरणार आहे.
प्रवेश प्रक्रियेत आरक्षण नकोच!
मराठा आरक्षण व आर्थिक दुर्बल घटक आरक्षणातून अकारावीचे प्रवेश देऊ नये, अन्यथा या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल तसेच रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा
इशारा अॅड. डॉ़ गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे़
अकरावी प्रवेशासाठी अर्जाचा दुसरा टप्पा लवकरच
अकरावी प्रवेशासाठी अर्ज नोंदणीचा पहिला टप्पा सुरू असून आतापर्यंत मुंबई विभागातील १,०५,०९१ विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या अर्जाचा पहिला टप्पा भरला असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. दहावी निकाल जाहीर झाल्यानंतर आता लवकरच प्रवेशाच्या जागा जाहीर करण्यात येणार असून अर्जाचा दुसरा टप्पा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
कृतिपत्रिकेने मराठीचा निकाल घसरला
मराठी, इंग्रजी प्रथम भाषा असणाºया विद्यार्थ्यांच्या निकालात मागील वर्षीपेक्षा तुलनात्मकदृष्ट्या कमालीची घट दिसून आली. मुंबई विभागात मराठी विषयांत ही घट १४ टक्के दिसून आली. मागील वर्षी मराठी विषयाचा निकाल हा ९०.९६ टक्के इतका लागला होता. यंदा तो फक्त ७६.१६ टक्के इतका लागला आहे. यंदा भाषा विषयात विद्यार्थ्यांमधील आकलनशक्ती आणि स्वविचार याला प्राधान्य देणाºया कृतिपत्रिकेवर आधारित प्रश्नपत्रिकेचे स्वरूप होते. मात्र या प्रश्नपत्रिकेमधील नव्या आराखड्याचा स्वीकार विद्यार्थी करू शकले नसल्याचे चित्र निकालावरून स्पष्ट झाले आहे.
मुंबईचा मराठी विषयाचा निकाल यंदा केवळ ७६.१६ टक्के लागला आहे. प्रथम भाषा म्हणून मराठी देणाºया परीक्षार्थींची संख्या यंदा १,३०,८५२ इतकी होती. त्यामधील केवळ ९९,६५८ विद्यार्थी मराठीत उत्तीर्ण होऊ शकले आहेत. मराठी द्वितीय किंवा तृतीय भाषा म्हणून परीक्षा दिलेल्यांच्या निकालातही हीच परिस्थिती दिसून येत आहे. मागील वर्षी अशा विद्यार्थ्यांचा निकाल ९३.०६ टक्के इतका होता, यंदा त्याची टक्केवारी ही ८१. ८९ टक्के इतकी घसरली आहे.
इंग्रजी विषयाच्या बाबतीतही हाच प्रकार घडला आहे. मागील वर्षी इंग्रजी विषयाचा निकाल ९७.८६ टक्के इतका होता. यंदा त्यात घसरण झाली असून तो ८८.३५ टक्के इतका लागला आहे. तर हिंदी विषयाचा निकाल मागील वर्षी ८९.७० टक्के इतका लागला होता, यंदा तो ८४.५९ टक्क्यांवर घसरला आहे. एकूणच मराठीप्रमाणे हिंदी, इंग्रजी विषयांतही विद्यार्थ्यांची दांडी गुल झाली आहे.
विषयनिहाय
निकालाची टक्केवारी
विषय २०१८ २०१९
मराठी ९०.९६ ७६.१६
हिंदी ८९.७० ८४.५९
इंग्रजी ९७.८६ ८८.३५
गणित ८९.१३ ८७.३८
विज्ञान-तंत्रज्ञान ९४. ३७ ८८.८६
समाजशास्त्र ९६.२८ ८४.७५