आता १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांनाही लोकल प्रवासाची मुभा, दूरवर राहणाऱ्यांना मिळणार दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 06:42 AM2021-10-16T06:42:36+5:302021-10-16T06:45:02+5:30
Mumbai Suburban Railway: मुंबईतील कॉलेजांमध्ये अकरावी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लोकलप्रवासाची मुभा देण्यात आल्याने कल्याण, डोंबिवली, वसई-विरार अशा दूरच्या ठिकाणी राहणा-या विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळाला आहे.
मुंबई : मुंबईतील कॉलेजांमध्ये अकरावी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लोकलप्रवासाची मुभा देण्यात आल्याने कल्याण, डोंबिवली, वसई-विरार अशा दूरच्या ठिकाणी राहणा-या विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळाला आहे.
कोरोनामुळे बंद असलेली लोकलसेवा सुरू करण्यात आल्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा देण्यात आली होती. त्यापाठोपाठ दोन लसी घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकलप्रवास करण्यास परवानगी देण्यात आली. आतापर्यंत ज्या प्रवाशांनी कोरोना लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झाले आहेत, अशा प्रवाशांना रेल्वे प्रवासासाठी पास देण्यास सुरुवात केली.
आता यापुढे १८ वर्षांखालील मुलांनाही लोकल प्रवास करता येणार आहे. तसेच काही महत्त्वाच्या आरोग्याच्या कारणांमुळे ज्यांना लस घेता येत नाही, अशांनाही रेल्वे प्रवासासाठी तिकीट मिळणार आहे. अशा लोकांनी तिकीट काढताना डॉक्टरांचे तसे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
वैद्यकीय कारणांसाठी प्रवासासाठीही पास
एखाद्या व्यक्तीला काही महत्त्वाच्या वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करायचा असल्यास त्यांनाही लोकल प्रवास करता येईल. त्यासाठीही डॉक्टरांकडून प्रमाणपत्र घ्यावे लागेल. हा पुरावा दाखवताच मासिक पास तिकीट खिडक्यांवर देण्यात येईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
पाससाठी पुरावा म्हणून ओळखपत्र महत्त्वाचे
रेल्वे मासिक पास घेण्यासाठी तिकीट खिडक्यांवर १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांना पुरावा म्हणून ओळखपत्र दाखवावे लागेल. प्रवासावेळी पास आणि ओळखपत्रही सोबत बाळगणे बंधनकारक असणार आहे.