मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून तयार होत असलेल्या कोस्टल रोडपर्यंत आता छत्रपती शिवाजी टर्मिनस तसेच पूर्व उन्नत मार्गावरुनही पोहोचता येणार आहे़ महापालिकेच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या आराखड्यामध्ये तसा बदल आज करण्यात आला आहे़ त्यानुसार मत्स्यालयासमोरुन समुद्रातून भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे़ हा मार्ग मलबार हिलमार्गे थेट प्रिय दर्शनीपार्कजवळ निघणार आहे़नरीमन पॉर्इंट ते कांदिवलीपर्यंत तयार करण्यात येणारा ३३ कि़मी़ चा सागरी मार्ग म्हणजेच कोस्टल रोडला एनसीपीए येथून प्रवेश देण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता़ मात्र पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज या परिसराची पाहणी करीत कोस्टल रोडच्या आराखड्या नवीन बदल केला आहे़ त्यानुसार एनसीपीएऐवजी आता मत्सालयासमोरुन हा भुयारी मार्ग सुरु होणार आहे़ तेथून पुढे मरीन ड्राईव्ह उड्डाणपुलाशी जोडून प्रिन्सेस स्ट्रीटपर्यंत हा मार्ग जोडण्यात येणार आहे़यापूर्वी एनसीपीए येथून बनिवण्यात येणारा भुयारी मार्गाचा प्रस्ताव मागे पडला आहे़ नवीन बदलामुळे सीएसटी रेल्वेस्थानक तसेच पूर्व उन्नत मार्गावरुन येणाऱ्या वाहनांना हा मार्ग सोयीचा ठरणार आहे़ या नव्या मार्गाचा आराखडा व खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याची जबाबदारी सल्लागारांवर सोपविण्यात येणार आहे़ आयुक्तांनी याबाबत आज निर्णय घेऊन अधिकाऱ्यांना तशा सूचनादेखील केल्या आहेत़ (प्रतिनिधी)वाहतूक कोंडीमुळे सध्या नरीमन पॉर्इंट ते कांदिवलीपर्यंतचा प्रवास दीड ते दोन तास लागत होते़ सागरी मार्गामुळे ४० ते ५० मिनिटांमध्ये हा मार्ग पार होणार असून यामुळे वेळेची मोठी बचत होईल़ वायू प्रदूषण कमी होईल व इंधनाचीही बचत होणार आहे़ बेस्टच्या बसगाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका असल्याने सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास जलद व दिलासादायी होणार आहे़