Join us  

आता अचानक पाणी, टेलिफोन बंद होणार नाही; रस्ते खोदणाऱ्यांना सरकारच्या ॲपवर जाऊन नोंदणी करणे बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 6:07 AM

कोणत्याही कामासाठी रस्ता खोदला की अचानक पाण्याची लाइन, टेलिफोन, गॅस अथवा वीजवाहिन्या विस्कळीत होऊन असंख्य नागरिकांचे हाल होण्याचे प्रकार सतत घडत असतात.

मुंबई : कोणत्याही कामासाठी रस्ता खोदला की अचानक पाण्याची लाइन, टेलिफोन, गॅस अथवा वीजवाहिन्या विस्कळीत होऊन असंख्य नागरिकांचे हाल होण्याचे प्रकार सतत घडत असतात. मुंबईत अलीकडेच वेरावली पाइपलाइन फुटल्याने अंधेरी पूर्व भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला तर काही महिन्यांपूर्वी ठाणे येथेही असाच प्रकार झाला. मात्र, यापुढे असे प्रकार संपुष्टात येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या ‘कॉल बिफोर यू डिग’ या प्रणालीची अंमलबजावणी राज्यातील सर्व विभागांना बंधनकारक करणारे आदेश जारी करण्यात आले आहेत.

रस्त्यांचे खोदकाम करणे आवश्यक असणारी कामे महानगरपालिका, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, वन, परिवहन, ऊर्जा, जलसंपदा आणि पाणीपुरवठा आदी विभागांकडून काढली जातात. आता या सर्व विभागांच्या अंतर्गत असलेल्या सर्व कार्यालयांना ‘कॉल बिफोर यू डिग’ या प्रणालीवर नोंदणी बंधनकारक करण्यात आली असून त्यासाठी एक खास ॲप तयार करण्यात आले आहे. 

 राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने काढलेल्या आदेशानुसार वरील विभागांनी रस्ते खोदावे लागणारे काम काढले की संबंधित कंत्राटदारांना ॲपवर जाऊन नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. ही पूर्वसूचना मानली जाणार आहे. त्यानंतर ज्या ज्या विभागांच्या सेवा-सुविधांचे जाळे असेल त्यांनी कोणती खबरदारी घ्यायची हे खोदकाम करणारांना कळवायचे आहे.

  हे महत्त्वाचे 

 खोदकाम करणारे या माहितीची नोंद घेऊनच त्यांचे काम करतील त्यामुळे कोणत्याही सुविधांची हानी होणे टाळले जाईल आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही. ज्या संस्था याची काळजी न घेता खोदकाम करतील त्यांना होणाऱ्या नुकसानीची भरपाई संबंधित विभागाला करणे बंधनकारक आहे. त्याची किंमत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दरानुसार करावी लागणार आहे.