लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या कमी होत असताना स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या सात महिन्यांत राज्यात १४२ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली. त्यातील सात जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य विभागाने या संदर्भातील सविस्तर पत्र पाठवून सर्व सरकारी रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. विशेष म्हणजे या पत्रात स्वाइन फ्लूवरील उपजचारांसाठी विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यापासून ते मृत्यू संशोधन समिती स्थापित करण्याच्या मार्गदर्शक सूचना यामध्ये देण्यात आल्या आहेत.
साधारणतः पावसाळ्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण पाहण्यास मिळतात. सध्याची स्थिती लक्षात घेतली तर रुग्ण वाढीची शक्यता नाकारता येत नसल्याचे पत्रात नमूद आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूर, नाशिक, नागपूर या भागांत प्रामुख्याने या आजाराचे प्रमाण आढळून आले आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व महापालिका, वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा परिषद, जिल्हा सामान्य रुग्णालयांना खबरदारीचे उपाय म्हणून मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत.
तसेच आरोग्य यंत्रणांनी, बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेणे, प्रयोगशाळा नमुने गोळा करण्याची आणि उपचारासाठी ५० ते १०० बेड्सची रुग्णालयात व्यवस्था करून ठेवणे, आयसीएमआर मान्यताप्राप्त कोविड निदानाच्या प्रयोगशाळा स्वाइन फ्लू निदानाचे काम करू शकतात. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. या आजारावरील साधनसामग्री आणि पुरेसा औषध साठा उपलब्ध करून ठेवणे, या सूचना देण्यात आल्या आहेत.
यावर्षीच्या रुग्णांच्या विभागनिहाय आकडेवारीनुसार, मुंबई - ४३, नाशिक -१७, नागपूर मनपा-१४, कल्याण -२, पालघर-२२, कल्याण डोंबिवली मनपा -२, पुणे- २३ मृत्यू २, ठाणे मनपा ७ मृत्यू २, कोल्हापूर १४ मृत्यू ३ या भागांचा समावेश आहे.