मुंबई: लोकल ट्रेनचं तिकीट घेण्यासाठी स्टेशनवरच्या लांबच लांब रांगेत उभं राहण्याची आता गरज उरणार नाही. कारण लवकरच मोबाईलच्या मदतीने तुम्हाला आता लोकलचं तिकीट काढता येणार आहे. यासाठी रेल्वेने ' UTS हे अॅप तयार केलं आहे. देशातील इतर शहरांमध्येही ही सेवा सुरू केली जाणार आहे, पण याची सुरूवात मुंबईतून होत आहे.
मोबाइलमध्ये UTS मोबाइल अॅप डाउनलोड करून तिकीट बूक केल्यानंतर एक क्यूआर कोड मिळेल. बूकिंग झाल्यानंतर स्थानकावर पोहोचून त्याचं प्रिंटआउट घ्यावं लागेल. प्रिंटआउट घेण्यासाठी रेल्वे स्थानकांवर ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन (OCR) मशीन लावण्यात येणार आहे. या मशिनवर क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर प्रिटआउट मिळेल. OCR मशिन छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, चर्चगेट, दादर, बांद्रा, अंधेरी आणि बोरिवली याठिकाणी लावण्यात येणार आहे. सध्या केवळ चाचणी घेण्यासाठी या मिशिन लावल्या जात आहेत, प्रयोग यशस्वी ठरल्यास इतर स्थानकांवर या मशिन लावल्या जातील. सध्या केवळ स्मार्टफोनवरूनच तिकीट बूक करता येईल पण प्रयोग यशस्वी झाल्यानंतर कोणत्याही फोनद्वारे तिकीट बूक करणं शक्य व्हावं या दृष्टिकोनातून बदल केला जाणार आहे. यापूर्वीही रेल्वेने लोकल तिकीट बूक करण्यासाठी एक अॅप सुरू केलं होतं, पण प्रतिसाद न मिळाल्याने ती सेवा बंद झाली.