Join us

आता मेट्रोमध्ये बिनधास्त बोला, सिनेमा पाहा अन् चॅटिंगही करा; मिळणार फुल नेटवर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 2:05 PM

पुढील दहा वर्षांत अंदाजे १ कोटी रुपये इतका अतिरिक्त नॉनफेअर बॉक्स महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

मुंबई :  महामुंबईमेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने मुंबई मेट्रोच्या खांबांवर छोटे आणि मायक्रोसेल टेलिकॉम टॉवर्स बसवून प्रवाशांसाठी दळणवळण सेवा प्रदान करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या उपक्रमांतर्गत पहिले १२ खांबांच्या माध्यमातून मोबाइल नेटवर्क देण्याची जबाबदारी इंडस टॉवर्स या आघाडीच्या दूरसंचार क्षेत्रातील पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या कंपनीला देण्यात आली आहे. इंडस टॉवर्सला शुक्रवारी स्वीकृती पत्र सुपुर्द करण्यात आले. ज्यामुळे पुढील दहा वर्षांत अंदाजे १ कोटी रुपये इतका अतिरिक्त नॉनफेअर बॉक्स महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.प्रवासादरम्यान नेटवर्क कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी महामुंबई मेट्रोने सूक्ष्म दूरसंचार सेल धोरण तयार केले आहे. या धोरणांतर्गत मेट्रोमार्ग २ अ आणि ७ या उन्नत मार्गावरील ३५ किलोमीटर लांबीच्या मार्गावर असलेल्या १५०० खांबांवर दूरसंचार उपकरणे लावण्यासाठी परवाना देण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट नेटवर्क कनेक्टिव्हिटीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करणे, प्रवाशांसाठी आणि आसपासच्या भागात राहणाऱ्या किंवा त्या भागातील रस्त्यावर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी सोईस्कर आणि अखंड दळणवळण सेवा सुनिश्चित करणे हा आहे. धोरणाला अनेक टेलिकॉम कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून, महामुंबई मेट्रो विविध इच्छुक एजन्सींसाठी मेट्रोच्या खांबांवर टेलिकॉम टॉवर्सच्या स्थापनेचा परवाना लवकरच देईल. याअंतर्गत पुढील १० वर्षांसाठी महामुंबई मेट्रोला तिकिटाव्यतिरिक्त येत्या १० वर्षांत सुमारे १२० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

- मेट्रो प्रवाशांना आणि लिंक रोड आणि पश्चिम द्रुतगती मार्गाच्या आजूबाजूला राहात असलेल्या लोकांना फायदा होईल.- जे या टेलिकॉम उपकरणाद्वारे अखंड नेटवर्कचा आनंद घेऊ शकतात.- आतापर्यंत महामुंबई मेट्रोने पुढील १५ वर्षांसाठी १५०० कोटींचा नॉनफेअर बॉक्स महसूल मिळवण्यात यश मिळवले आहे.

धोरण प्रवाशांसाठी आणि महामुंबई मेट्रोसाठी फायदेशीर असून, प्रवाशांना प्रवासादरम्यान अखंड नेटवर्क कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. मुंबई मेट्रोच्या खांबांवर सूक्ष्म दूरसंचार उपकरण बसवण्यामुळे महामुंबई मेट्रोला मिळणाऱ्या अतिरिक्त महसुलामुळे मेट्रो प्रवाशांसाठी परवडणारी आणि उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देण्यात मदत होईल.- एस. व्ही. आर. श्रीनिवास, अध्यक्ष, महामुंबई मेट्रो 

टॅग्स :मुंबईमेट्रोमोबाइल