मुंबई : राज्यात सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या महापालिकेत शिवसेना एक नंबरवर असून ती नंबर वनच असली पाहिजे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसही दुसऱ्या क्रमांकावर राहिली पाहिजे. पालिकेतील नगरसेवकांची संख्या आठवरून ५०-६० वर गेली पाहिजे. त्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी कार्यकर्त्यांना केले.सायन येथील सोमय्या मैदानात रविवारी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार म्हणाले, दोन वर्षात मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. पुढच्या काळात समविचारी पक्षांना घेवून वाटचाल करायची आहे. शिवसेनेची विचारधारा वेगळी असली तरी भाजपपेक्षा किती तरी चांगली आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत आघाडी केली आहे.येत्या काळात मुंबईतून जास्तीत जास्त १० आमदार आणि महानगरपालिकेत ५० ते ६० नगरसेवक आले पाहिजेत, असे आवाहन पवार यांनी केले. राष्ट्रवादीचे हे मिशन शिवसेना किंवा इतर पक्षांच्या विरोधात आहे अशा वावड्या उठवल्या जातील. परंतु आमचे हे मिशन पक्षाचा जनाधार कसा वाढेल यासाठी आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.>भाजपला हद्दपार करू - नवाब मलिकमुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढल्याने भाजपला मुंबईतून संपवण्याची तयारी आजपासून सुरू झाली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या मिशन २०२२ ची घोषणा केली. आगामी दोन वर्षांत २२७ वॉर्डमध्ये संघटनेला ताकदीने उभे करण्याची माझी जबाबदारी आहे. यापुढे आयाराम गयारामांना संधी दिली जाणार नाही असे आश्वासनही त्यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्य आता मुंबई महापालिका, नगरसेवकांची संख्या ८ वरून ६० वर नेण्याचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 6:01 AM